बुलडाणा : शेतात कष्टाचे कामे करीत असताना किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्याला इजा झाल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र या योजनेविषयी माहितीच अनेक शेतकर्यांपर्यंत पोहोचविली जात नाही. त्यामुळे अनेक मृतकांचे कुटुंब या योजनेपासून वंचित राहिले आहेत. १ डिसेंबर २0१५ ते ३१ नोव्हेंबर २0१६ या सात महिन्यांत केवळ ३६ प्रकरणे दाखल करण्यात आली. शेतीची कामे करीत असताना वीज पडणे, विजेचा झटका लागणे, सर्पदंश, विंचूदंश, रस्त्यावरील वाहनाने अपघात, जनावराने चावल्याने किंवा हल्ला केल्याने, खून झाल्यास, दंगलीत मृत्यू झाल्यास किंवा शेतकर्याला अपंगत्व आल्यास त्या शेतकर्याच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा, यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने डिसेंबर २0१५ ते ३0 नोव्हेंबर २0१६ या कालावधीसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलात आणली. राज्य शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने १0 ते ७५ वयोगटातील शेतकर्यांसाठी अपघात विमा योजना अंमलात आणली आहे. मात्र, या योजनेची तालुक्यातील बर्याच गावांमध्ये माहिती पोहोचलीच नाही. या योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यात कृषी विभाग अपयशी झाल्याचे दाखल झालेल्या ३६ प्रस्तावांतून सिद्ध होत आहे. त्यामुळे या योजनेचा शेतकर्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तालुका कृषी विभागाने प्रत्यक्षात शेतकर्यांशी संपर्क करणे आवश्यक आहे.
अपघात विम्यापासून शेतकरी वंचित!
By admin | Published: July 04, 2016 1:39 AM