लोकमत न्यूज नेटवर्क वरवट बकाल : भाजीपाला पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेलेला येथील युवा शेतकरी अमोल पुंडलिक टाकळकार (वय-३०)याला विजेचा जबर शॉक लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील आपल्या मालकीच्या शिवारातील गट नंबर ७४६ या शेतात शेतकरी अमोल पुंडलिक टाकळकार याने भाजीपाल्याची लागवड केली. त्या पिकाला पाणी देण्यासाठी वीज पंप चालू करत असताना त्याला मीटर पेटी व्दारे विजेचा जबर धक्का बसला. त्यामध्ये शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला. याबाबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माहिती होताच घटनास्थळी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. यावेळी तामगाव पोलिसांनी पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत शेतकऱ्याचे गेल्यावर्षीच लग्न झाले होते. त्याच्या पश्चात आई,पत्नी,तीन बहिणी,असा आप्त परिवार आहे. प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. दरम्यान, युवा शेतकऱ्याचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वीजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2020 11:41 AM