बुलढाणा: कांदा अनेकदा ग्राहकांना रडवतो, तर कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो. कांद्याच्या दरात होणारे चढउतार ग्राहकांसाठी, शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरतात. चांगला दर न मिळाल्यास कधीकधी शेतकरी मेटाकुटीला येतो. बुलढाण्यातील शेगावमधल्या एका शेतकऱ्यावरदेखील अशीच वेळ आली आहे. उत्पादन खर्चदेखील वसूल होत नसल्यानं शेतकऱ्यानं २०० किलो कांदा फुकट वाटला.
शेगावच्या गणेश पिंपळेंनी दोन एकर शेतात कांद्याचं पीक घेतलं. चांगला दर मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र मागणी घसरली. कांद्याची विक्रीच होईना. त्यामुळे पिंपळेंनी कांदा आपल्या घराबाहेर ठेवला आणि आसपासच्या लोकांना तो घेऊन जाण्याचं आवाहन केलं. मोफत कांदा मिळत असल्याचं समजतात लोकांनी पिंपळेंच्या घराबाहेर गर्दी केली. कांद्यासाठी लोकांची झुंबड उडाली. कांद्याला दर न मिळाल्यानं पिंपळे यांचं अडीच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
मी दोन एकरात कांद्याचं उत्पादन घेतलं. त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च आला. व्यापारी कांदा घेत नाहीत. बऱ्याचशा कांदा उत्पादकांची हीच स्थिती आहे. कांद्याला मागणी नसल्यानं मी तो लोकांना मोफत दिला. मी पूर्णपणे कर्जात बुडालो आहे. यापुढे शेती कशी करायची हा प्रश्न पडला आहे, अशा शब्दांत पिंपळेंनी त्यांची व्यथा मांडली.