मोताळा (जि. बुलडाणा), दि. २४- तालुक्यातील खरबडी येथील ४३ वर्षीय शेतकरी पुत्राचा आपल्याच विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २४ डिसेंबरच्या सकाळी उघडकीस आली. गजानन निनाजी पाचपांडे रा. खरबडी यांनी फिर्यादीत नमूद केले, की त्याचा भाऊ अजय (आदीनाथ) निनाजी पाचपांडे (वय ४३ रा. खरबडी) याचा मृतदेह वरूड मार्गालगतच्या त्यांच्या शेतातील (गुरी) विहिरीत आढळून आला. खरबडी येथील निनाजी पाचपांडे हे त्यांच्या दोन्ही मुलासह वरूड मार्गावरील शेतात राहतात. शनिवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास निनाजी पाचपांडे यांना शेतातील विहिरीच्या काठावर मोबाइल, चार्जर व बुट आढळून आला. त्यांनी विहिरीत डोकावले असता, त्यांचा मुलगा अजयचा मृतदेह पाण्यावर तरंगत्या अवस्थेत आढळून आला. तत्काळ निनाजी पाचपांडे यांनी तंटामुक्ती अध्यक्षांना सूचना दिली. बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोहेकॉ सुनील हिवाळे करीत आहेत. मृतक हा अविवाहित असल्याचे समजते.
शेतकरी पुत्राचा विहिरीत बुडून मृत्यू
By admin | Published: December 25, 2016 2:31 AM