बुलडाणा: केंद्र व राज्य शासन शेतकर्यांच्या उन्नतीसाठी प्रभावी योजना राबवीत आहे. कृषि निविष्ठा खरेदी सुलभ होणे, शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढविणे, पिकांचा विमा उतरविणे, शेतीत अपारंपारिक अर्थात सौर उर्जेचा वापर वाढविणे अशा योजना त्यासाठी कार्यान्वीत आहेत. यासोबतच शेतकर्यांना निश्चित आर्थिक मदतीची हमी देणारी योजना प्रधानमंत्री किसान (शेतकरी) सन्मान निधी योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेमुळे निश्चितच शेतकर्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपदान अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी रविवारी येथे व्यक्त केले. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा संपूर्ण देशात २४ फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला. त्यानुसार जिल्ह्यातही योजनेच्या शुभारंभीय कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्रात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी अशोक तायडे, बुलडाणा पं.स सभापती तस्लीमाबी रसूलखान, जि.प सदस्या शैलजा पठाडे, पं.स सदस्य संदीप उगले, अग्रणी बँक व्यवस्थापक उत्तम मनवर, कृषि विकास अधिकारी श्रीमती महाबळे, तहसिलदार सुरेश बगळे, गटविकास अधिकारी सावळे, कृषि विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश जाधव, केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सी.पी. जायभाये प्रामुख्याने उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी दुबे पुढे म्हणाले की, शेतकर्यांना कर्जविषयक अडचणी असतात. अशा वेळी संबंधित तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधावा. शेतकर्यांच्या पाठीशी शासन व प्रशासन दोन्ही खंबीरपणे उभे आहेत. याप्रसंगी नाबार्डचे सुभाष बोंदाडे व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मनवर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूर येथे योजनेच्या देशपातळीवरील शुभारंभीय कार्यक्रमाचे प्रसारण दाखविण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थी असलेल्या अंबादास आवटे, आनंदा साखरे, कृष्णा नरोटे, गजानन नरोटे, गोविंदा कापसे, योगेश घुसे (रा. जनुना), काशीनाथ गवळी, गणेश बोबडे, जगन्नाथ सोनटक्के, अमोल शिंगणे (रा. मढ), सुनील लोखंडे व सचिन अढाव (रा. वडगांव खंडोपंत ता. मोताळा), पांडुरंग वाघमारे व सदानंद गायकवाड (रा. केळवद ता. चिखली) या शेतकर्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान योजनेचा पहिल्या हप्त्याचा लाभ लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. प्रतिनिधीक स्वरूपात नरेंद्र श्रीराम दिघोळे (रा. झोटिंगा, ता. दे.राजा), अनुसयाबाई रहाणे, काळेगांव यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा एसएमएस यावेळी दाखविण्यात आला. संचलन केव्हीकेचे डॉ. जगदीश वाडकर यांनी केले. आभार केव्हीकेचे राहुल चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
सन्मान निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू
जिल्ह्यात जवळपास ती हजार ७२१ शेतकरी पहिल्या टप्प्यात शेतकरी सन्मान निधीसाठी पात्र ठरल्याची माहिती असून त्यांच्या खात्यात हा निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिला हप्ता जमा होत असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्हास्तरावर सर्व प्रशासकीय यंत्रणा योजनेचा लाभ पात्र शेतकर्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रीय झाली असून युद्ध पातळीवर ही कामे सुरू झाली आहेत.