बुलढाणा : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे शिवारात शनिवारी घडली. सध्या जखमी असलेल्या शेतकऱ्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे येथील शेतकरी प्रकाश श्रीराम मुंढे (वय ५३) यांचे पांग्रा डोळे शिवारात शेत आहे. ते नेहमीप्रमाणे शेतात काम करून शेतातून पायी घरी येत होते.
दरम्यान, समोरून रानडुकराचा कळप त्यांच्या अंगावर चालून आला. या कळपातील एका रानडुकराने प्रकाश मुंढे यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांना चावा घेतल्यामुळे प्रकाश मुंढे हे गंभीर जखम झाले. या रानडुकरापासून मुंढे यांनी कशीबशी आपली सुटका करून घेत घर गाठले. दरम्यान, त्यांना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. सध्या बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रानडुकरांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती
लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे शिवारात रानडुकरांचा वावर वाढला आहे. रानडुकरांकडून वारंवार शेतकरी व मजुरांवर हल्ले होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.