बुलडाणा : बिबट्याच्या हल्लयात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना मोताळा तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथे १३ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. जखमीवर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मोताळ्यापासून जवळ असलेल्या वडगाव खंडोपंत येथील ४० वर्षीय शेतकरी राजू बावस्कर पहाटे सहा वाजेच्या दरम्यान शेतात मोटार सुरु करण्यासाठी पायी जात होते. दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या पोटाला व मानेलाही बिबट्याने नखोरे मारले आहेत. बावस्कर यांनी बिबट्याच्या हल्लयातून कशीबशी सुटका केली. गंभीर अवस्थेतच फोनवरुन त्यांनी कुटुंबीयांना माहिती कळविली. तत्काळ परिवारातील सदस्य व गावकरी मदतीला धावून आले व जखमीस जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.या घटनेमुळे परिसरातील शेतक-यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतक-यांना पहाटे लवकरच शेतात जावे लागते. मात्र वन्यप्राणी हल्लयाच्या घटनामुंळे शेतक-यांच्या चिंता वाढल्या आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 4:02 PM