मलकापूर : वीज कनेक्शन व नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून तालुक्यातील वडोदा येथील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. गोविंद विष्णू महाजन विद्यालयात आयोजित कृषी विकास प्रदर्शनीत शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता ही घटना घडली. पोलिसांनी तत्काळ संबधित शेतकऱ्यास रुग्णालयात उपचारासाठी हलवले. कृषी विकास परिषद अंतर्गत स्थानिक गोविंद विष्णू महाजन विद्यालयाच्या प्रांगणावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी व कृषी विकास प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन ना. रणजित पाटील यांच्या हस्ते शनिवारी झाले. या सोहळ्याला पालकमंत्री ना. मदन येरावार, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे स्वागताध्यक्ष ना. चैनसुख संचेती, आ. आकाश फुंडकर, जि.प.अध्यक्षा उमाताई तायडे, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सोहळा सुरु असतानाच मलकापूर तालुक्यातील वडोदा गावातील इश्वर सुपराव खराटे या शेतकऱ्याने पिशवीतून विषाची बॉटल काढून तोंडात टाकली. तेवढ्यात पोलिसांनी त्यास पकडून बाहेर नेले. पोलिसांनी संबधित शेतकºयास तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. सध्या या शेतकऱ्यावर बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
३८ वर्षापासून नाही मिळाले वीज कनेक्शनया शेतकऱ्याला ३८ वर्षांपासून विज कनेक्शन मिळालेले नाही. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे तीन पिढ्यांपासून हा शेतकरी विजेची प्रतीक्षा करीत आहे. मागेल त्याला वीज कनेक्शन असा डांगोरा सरकार पिटत असली तरी बुलढाणा जिल्ह्यातील या शेतकऱ्याला तीन पिढ्यांपासून विज कनेक्शन पासून वंचित रहावे लागल्याची वास्तविकता आहे.