नितीन निमकर्डे। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत. ११ जूनला कर्जमाफीची पहिली घोषणा झाल्यापासून आतापर्यंत विदर्भ-मराठवाड्यातील ११ जिल्ह्यात २२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यात बुलडाणा जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाच नसल्याचे स्पष्ट होत आहे.शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर रविवार, ११ जून रोजी राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता देत अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज माफ केल्याची घोषणा केली होती; परंतु या कर्जमाफीचे निकष जाहीर केले नव्हते. दरम्यान, शनिवार, २४ जून रोजी सरसकट कर्जमाफीचे स्वरूप जाहीर करताना सरकारने दीड लाखांपर्यंतचे ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ केले; परंतु या कर्जमाफीचा लाभ मिळण्याकरिता सन २०१६-१७ मधील कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. याकरिता मुदतसुद्धा ३० जूनपर्यंतच असल्याने या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे.जिल्हानिहाय आत्महत्येची आकडेवारी११ जूनला कर्जमाफी जाहीर झाल्यापासून विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्याप्रवण ११ जिल्ह्यांमधील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी पुढीलप्रमाणे अकोला दोन, बुलडाणा चार, वाशिम दोन, गोंदिया दोन, भंडारा एक, यवतमाळ एक, नागपूर एक, हिंगोली तीन, परभणी चार, नांदेड एक, लातूर एक, अशा एकूण २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.कर्जमाफीच्या अटी ठरताहेत जाचकसन २०१२ पासून सलग तीन-चार वर्षे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शासनाकडून घालण्यात आलेल्या अटी जाचक ठरत आहेत. दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी उर्वरित कर्जाचा भरणा त्वरित करायला लावणे संयुक्तिक नाहीच. त्यातही अनेक शेतकऱ्यांचे सन २०१६ मधील पुनर्गठन झालेले कर्जच तेवढे माफ झालेले आहे. जे पाच टप्प्यात भरावयाचे होते व ज्याचा शेतकऱ्यांना फारसा ताण नव्हताच, ते माफ केले आणि चालू वर्षातील मोठे कर्ज ताबडतोब भरायला लावले जात असल्याने फसविले गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे.
कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच!
By admin | Published: July 01, 2017 12:06 AM