लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूरः पावसाने दांडी मारल्याने संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यावर दूबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यातील बावनबिर येथील एका शेतकऱ्याने सोयाबीन पिक कोमजू लागल्याने १० एकरातील पिकावर ट्रॅक्टरने नांगर फिरवला आहे. येथील प्रशांत खोडे या शेतकऱ्याने ५ एकर मालकीचे व ५ एकर भाडेतत्त्वावरील असे एकूण १० एकर क्षेत्रफळात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. सुरुवातीला पाऊस चांगला पडल्याने पेरलेले सोयाबीन चांगल्याप्रकारे उगवले. पेरणी साधल्याने हा शेतकरी आनंदात होता. मात्र या शेतकऱ्याची खूशी फार काळ टिकू शकली नाही. वरूणराजा प्रकट होऊन पिकांना जीवदान देईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्याच्या हाती निराशा लागली. वरुणराजाने डोळे वटारल्याने निघालेले सोयाबीन पिक सूकल्याने शनिवारी रोजी या शेतकऱ्याने तब्बल १० एकर सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवले आहे. दि. १७ जूनला या शेतकऱ्याने दहा एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. पाऊस चांगला पडल्याने सोयाबीन तासी दिसू लागले. मात्र पावसाने दडी मारल्याने उगवलेले सोयाबीन कोमजू लागले. पाण्याअभावी ७० ते ८० टक्के पिक नष्ट झाल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने नागरणी करून शेत मोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. संग्रामपूर तालुक्यात बहुतांश ठिकाणी पावसाने बगल दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालूक्यात पावसाअभावी वाळलेल्या पिकावर नांगर फिरवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षापासून संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी दुष्काळासह कमी पाऊस, जास्त पाऊस, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट अशा आसमानी संकटांना तोंड देत आहे. शासन स्तरावरून दुर्लक्षित असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गही साथ देत नसल्याने आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांची आता दूबार पेरणीकडे वाटचाल सुरू झाली आहे. यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाने तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये हजेरी लावल्याने मुगात पेरणी झाली. यंदा चांगला पाऊस बरसणार अशा हवामान खात्याच्या वावड्या उडाल्याने शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न पडू लागले. मोसमात पेरणी झाल्याने तसेच पिका पूरता पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुटले होते. मात्र चेहऱ्यावरील हसू फार काळ टिकू शकले नाही. पावसाच्या दडीने शेतकऱ्यांनी पाहलेले हिरवे स्वप्न आता काळे पडू लागले आहे. पेरणी केलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. खरीपाची पिके पाण्याअभावी वाळत असल्याने बावनबिर येथील शेतकऱ्याने तब्बल दहा एकर पिकावर नांगर फिरवला आहे. यावरून शेतकऱ्यांच्या भयावह परिस्थितीची जाणीव होत आहे. शासनस्तरावरून आर्थिक बळ मिळेल या आशेवर येथील शेतकरी आहे.
शेतकऱ्याने दहा एकर सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:48 PM