मेहकरः पेनटाकळी प्रकल्पावर असलेल्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसल्याने अनेक शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करीत मेहकर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शनिवारी हल्लाबोल केला.
मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पावर मोठा कालवा असून, या कालव्याच्या माध्यमातून हजारो हेक्टरचे सिंचन केले जाते. यामध्ये शेतकरी गहू, हरभरा, ऊस, उन्हाळी भुईमूग यांसह भाजीपाला पिकांना या कालव्याद्वारे सिंचन केले जाते. या कालव्याद्वारे रब्बी पिकांना सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले होते; मात्र कालवा हा झाडेझुडपे व गवत याने वेढला असल्याने या कालव्याद्वारे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतच नाही. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवायचे असल्यास पाणी मोठ्या प्रमाणावर कालव्यात सोडावे लागते. तेव्हाच जेमतेम पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचते; मात्र डिसेंबर महिन्यामध्ये सदर कालवा हा पेनटाकळी शिवारात कालव्याला भगदाड पडून कालवा फुटला होता. यामधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या कालव्याची दुरुस्ती करून पंधरा दिवसानंतर पुन्हा पाणी सोडण्यात आले होते; मात्र या कालव्यात झाडेझुडपे व गवत असल्यामुळे हा कालवा परत फुटण्याची भीती वाटत असल्याने पाणी कमी प्रमाणात सोडण्यात येत आहे. त्यामुळे हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतच नाही. मेहकर तालुक्यातील वरवंड, उटी, पार्डी, घाटनांद्रा, गोमेधर आदी ठिकाणाहून शेकडो शेतकरी यांनी पेनटाकळी प्रकल्पाचे पाटबंधारे विभाग व पाणी वापर संस्थेच्या महासंघाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला होता. यामुळे पेनटाकळी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे व कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी. त्याच वेळेस उर्वरित शेतकऱ्यांचे शेती सिंचन होईल, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.