वीर किसान पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी डोके
बुलडाणा : भारतीय वीर किसान पार्टीच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी रामेश्वर डोके यांनी निवड करण्यात आली आहे. पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जी. आर. वगळी यांनी एका नियुक्तिपत्राद्वारे रामेश्वर डोके यांची निवड केली आहे.
धाड परिसरात पोलिसांची गस्त वाढवा
धाड : परिसरात गेल्या महिन्यापासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी धाड पोलीस स्टेशनकडून परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी हाेत आहे.
नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी
बुलडाणा : शहराला लागूनच असलेल्या सुंदरखेड भागात गत काही दिवसांपासून महिनाआड पाणीपुरवठा हाेत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना आरओचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या भागात नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी विजय क्षीरसागर यांच्यासह इतरांनी केली आहे.
पुलाचे काम तातडीने करण्याची मागणी
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील मुंबई-नागपूर राज्य महामार्गावरील राहेरी गावाजवळील खडक पूर्णा नदीवरील पूल जीर्ण झाला असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी हाेत आहे.
बसमध्ये काेराेनाविषयक नियमांचा फज्जा
बिबी : काेराेना संसर्गाचे रुग्ण कमी झाले असले तरी धाेका कायम आहे. अनलाॅक प्रक्रियेंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. बसवर ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ असे फलक लावलेले आहेत. मात्र, एकही प्रवासी मास्क लावत नसल्याने काेराेनाविषयक नियमांचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.
अवैध धंदे बंद करण्याची मागणी
देऊळगाव राजा : तालुक्यात गत काही दिवसांपासून अवैध धंदे वाढले आहेत. त्यामुळे अवैध धंदे बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तिडके यांनी पाेलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
मिरची उत्पादक शेतकरी संकटात
किनगाव जट्टू : वातावरणात हाेणाऱ्या बदलामुळे गहू, हरभरापाठाेपाठ मिरचीचे पीक धाेक्यात आले आहे. त्यामुळे, परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. परतीच्या पावसाने थैमान घातल्याने खरिपाची पिके हातातून गेली आहेत. आता रब्बी पिकावर शेतकऱ्यांची मदार आहे; परंतु वारंवार होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे मिरचीवर राेगराई आल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
दुचाकी चालकांना हेल्मेटचा विसर
बुलडाणा : दुचाकी चालकांना हेल्मेटचा विसर पडल्याचे चित्र बुलडाणा शहरात दिसून येत आहे.अनेक जण दुचाकी चालवताना माेबाइलवर बाेलत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच वाहतुक नियमांचेही पालन हाेत नसल्याचे चित्र आहे.
दिव्यांगांच्या स्वतंत्र शिधापत्रिकांसाठी हालचाली
बुलडाणा : दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका देण्याबाबत पुरवठा विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात जिल्ह्यातील तहसीलदारांना पत्र पाठविण्यात आले आहे. निश्चित केलेल्या लाभार्थींना जसे लाभ मिळतात, त्याच दरात दिव्यांनांना धान्य देण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.
मेहकर नगरपालिकेची हद्दवाढ करण्याची मागणी
मेहकर : स्थानिक नगर परिषदेच्या वतीने वेळोवेळी किरकोळ त्रुटीमुळे परत आलेल्या मेहकर हद्दवाढीच्या प्रस्तावातील त्रुटी दुरुस्त करून पालिकेने नवीन प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्याप मंजूर न झाल्याने शहरातील काही भाग नगरपालिका हद्दीच्या बाहेरच आहे. त्यामुळे मेहकर नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रश्न केव्हा सुटणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
शेत रस्त्यासाठी तहसीलदारांना निवेदन
बीबी : परिसरात शेत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून शेत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी शिवाजी बनकर, राम भालेकर यांनी लोणार तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.