अतीपावसामुळे सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनस्तरावरून पंचनामे करून दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत प्रति हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे दोन टप्प्यांमध्ये ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार होती. दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमा करण्याचे आदेश दिल्यानंतरही अद्याप शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकरी या मदतीपासून आजही वंचित आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या मदतीचा अर्धा हप्ता जमा झाला होता, ते सुद्धा दुसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. काही शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला त्यांना सुद्धा विम्याची रक्कम मिळाली नाही. थकलेले विम्याची रक्कम व ज्या लोकांनी नेटवर्कअभावी आपल्या पिकाचा विमा उतरवू शकले नाही, त्यांनाही मदत देण्याची मागणी होत आहे. नुकसान होऊनही ज्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने आज पर्यंत पैसे दिले नाही, ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
पीक नुकसानापोटी जेवढा मदत निधी आला होता, तो वाटप करण्यात आला आहे. ज्यावेळेस दुसऱ्या टप्प्यातील निधी येईल, त्यावेळी तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
सावंत, तहसीलदार, सिंदखेड राजा