लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने कर्जमाफीचा आदेश काढल्यानंतर शेतकऱ्यांकडून बँकेत वाऱ्या सुरू झाल्या आहेत; मात्र निकष आडवे येत असल्याने अनेकांना बँकेची नकारघंटा ऐकावी लागत असून, पदरी निराशा पडत आहे.राज्य शासनाने दीड लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची घोषणा नुकतीच केली असून, याबाबतचे आदेशही काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपले कर्ज माफ झाले असेल, या आशेने अनेक शेतकरी बँकेत विचारणा करण्यासाठी येत आहेत; मात्र बँकेकडून त्यांना कर्जमाफीचे निकष सांगून टोलवून लावले जात आहे. केवळ २०१२ ते जून २०१६ या काळातील थकीत कर्जच व तेही दीड लाखाच्या मर्यादेत माफ होणार आहे. दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असल्यास कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी उर्वरित कर्ज भरावे लागणार आहेत. याशिवाय नवीन कर्जही मिळणार नसल्याने अनेक शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागणार आहे. सदर कर्जमाफीबाबत विचारणा करण्यासाठी अनेक शेतकरी बँकेत येत असून, त्यांची गर्दी बँकेत दिसून येते, तर चौकशी करणाऱ्यांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना टोलवून लावण्याकडे त्यांचा कल वाढला आहे, तर मागिल आर्थिक वर्षातील कर्जसुद्धा माफ होणार नसल्याने नवीन कर्जासाठी त्याचा तातडीने भरणा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांचे कर्ज केवळ नवे-जुने होणार असल्याने अनेक जण कर्जाचा नादच सोडून देत असल्याचेसुद्धा दिसून येते.कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम !माझे सन २०१५-१६ मधील कर्जाचे पुनर्गठन झालेले आहे, तर सन २०१६-१७ मधील कर्ज अद्याप भरलेले नाही. पुनर्गठीत कर्ज हे थकीत मानले जात नसल्याने शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मला मिळणार की नाही, याबाबत मला समजेनासे झाले आहे. लाभ मिळणार असेल तरी, फारसा उपयोग होणार नाही, हे निश्चित आहे. पुनर्गठीत झालेल्या कर्जापोटी बँकेने मागिल वर्षी पीक विम्याची रक्कमही परस्पर जमा करुन घेतली होती, अशी माहिती यावेळी एका शेतकऱ्याने लोकमतशी बोलताना दिली.
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या बँकेत वाऱ्या!
By admin | Published: July 06, 2017 12:20 AM