लोकमत न्यूज नेटवर्कसोनाळा : वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तीचा एमबीबीएससाठी शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्यानंतरही जातवैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध न झाल्याने शेतमजूर कुटुंबातील मुलीचे डाँक्टर बनण्याचे स्वप्न भंगले आहे. सोनाळा येथील पिंगळी वेशीवर राहत असलेले शेतमजूरी करणारे शेतकरी साहेबराव सोनोने यांच्या स्वाती नामक मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. स्वातीने गावातील श्री संत सोनाजी महाराज हायस्कुलमध्ये दहाव्या वर्गात ९७ टक्के तर १२ व्या वर्गात ८५ टक्के गुण मिळवले. गोवारी समाजातील असल्याने जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी स्वाती सोनोने हिने १६ ऑगस्स्ट २०१९ मध्ये समितीच्या अमरावती कार्यालयाकडे अर्ज केला होता. प्रवेशाच्या वेळेपर्यंत तिला प्रमाणपत्र नाकारले नाही आणि दिलेही नाही. अनुसुचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या कार्यालयात तीन दिवस चकरा मारूनही समितीकडून वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. तीचा एमबीबीएससाठी श्री भाऊसाहेब हिरे मेडीकल काॅलेज वर्धा येथे नंबर लागला. प्रवेशासाठी तिची सर्व तयारी झाली. मात्र, अनुसुचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे काॅलेजमध्ये तिचा प्रवेश झाला नाही.
वैधतेसाठी २०१९ मध्ये अर्ज केला होता. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. समितीच्या अधिकाऱ्यांनी वेळेपर्यंत निर्णय घेतला नाही. अखेर महाविद्यालयाने प्रवेश नाकारला.- स्वाती सोनोने, विद्यार्थीनी सोनाळा.