शेगाव : येथील नाफेड खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी केंद्रावर निदर्शने केली. शेगाव येथे नाफेड अंतर्गत उडीद, मूग, सोयाबिनची खरेदी अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अद्याप नाफेड केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांना शेतमालाची बेभाव विक्री करावी लागत आहे. आधीच अत्यल्प पावसामुळे उत्पादन खूपच कमी होवून पेरणीचाही खर्च निघाला नाही. आता जेवढा शेतमाल घरात आला, तो विनादर द्यावा लागत आहे. सरकार हमी भावाने खरेदी करून काहीतरी आधार मिळेल, अशी आशा असताना हंगाम संपत आला, तरी शेगाव येथील नाफेड केंद्र अद्याप सुरु झालेले नाही. शेतकरी गजानन लहाने यांनी याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन सकाळपासूनच नॉट रिचेबल येत आहे. त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांनी संपर्क केला. पण, काही उपयोग झाला नाही. त्यामुळे येथील केंद्र कधी सुरू होणार याची साधी माहितीही मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.नाफेड केंद्रावर शेतकरी गजानन लहाने, शंकर लोखंडे, संतोष शेगोकार, विजयसेठ काठोळे, व्यंकटेश घाटोळ, रविंद्र धुमाळे, नरेंद्र खेट्टे, चक्रधर लोखंडे, संदीप काठोळे, प्रवीण शेगोकार, नंदकिशोर पोटे, शोभाबाई सोनोने, सचिन देशमुख, गजानन भोंडेकर आदींसह शेतकरी बांधवांनी निदर्शने करून डीएमओचा निषेध केला. शासनाने शेगाव येथील नाफेड केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे .
शेगावात नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांची निदर्शने; अद्याप खरेदी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 2:17 PM