भूमराळा येथील शेतकरी अजय देवानंद सानप व बीबी येथील शेतकरी सखाराम कुलकर्णी यांनी ठिबक व स्प्रिंकलरसाठी एका वर्षाआधी ऑनलाईन अर्ज केले होते. वर्ष उलटून गेले तरीही अनुदान मिळेना; त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. हे अनुदान लकी ड्रॉ पद्धतीने होत असून, या लकी ड्रॉमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे. या शेतकऱ्यांनी एक वर्ष अगोदर ऑनलाईन अर्ज केले होते. त्यांचे अनुदान अजूनपर्यंत मिळाले नाही. काही शेतकऱ्यांनी पाच ते सहा महिन्यांत अनुदान घेतले आहे. त्यामुळे लकी ड्रॉ पद्धतीने होत असलेल्या ठिबक सिंचन व स्प्रिंकलर योजनेमध्ये घोळ सुरू असल्याची चर्चा सध्या लोणार तालुक्यात होत आहे. कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा घोटाळेबाजी करणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करावी व या शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान त्वरित द्यावे अन्यथा कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे लोणार कृषी अधिकारी यांना दिला आहे.
काहींना अर्जानंतर तीन महिन्यातच लाभ
एखाद्या शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज सादर केला असेल आणि लकी ड्रॉ पद्धतीने त्याचा नंबर जर दोन-तीन वर्षांनी येत असेल तर त्या योजनेचा काय फायदा? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. म्हणून लकी ड्रॉ पद्धतीवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही. वर्षाअगोदर ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान मिळत नाही आणि तीन-चार महिन्यांत ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळते कसे? असा संतप्त सवाल भूमराळा येथील शेतकरी अजय सानप व बिबी येथील शेतकरी सखाराम कुलकर्णी यांनी केला आहे.