- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भरड धान्य खरेदी योजनेंतर्गत धान्याची विक्री शासनाला करताना संबंधित केंद्रात शेतीच्या माहितीसोबतच शेतकऱ्याला त्याची जात विचारली जाणार आहे. ती माहिती केंद्र शासनाला सादर करण्यासाठी गोळा केली जात आहे. त्यानुसार शेतकऱ्यांचे वर्गिकरण केले जाईल, असे पत्र केंद्राने राज्याला दिले आहे.किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गंत खरिप हंगाम २०२०-२१ मध्ये भरडधान्य खरेदी योजना १ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्यात महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशन, राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत खरेदी केली जाणार आहे. त्यानुसार ज्वारी, बाजरी मका, धान, रागी या भरड धान्याची खरेदी या संस्थांकडे देण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात उत्पादित होणाºया भरडधान्याची खरेदी करण्यासाठी आवश्यकतेनुसार केंद्राची निर्मिती संबंधित जिल्हाधिकारी करणार आहेत. प्रत्येक केंद्र व त्याठिकाणी जोडली जाणारी गावेही निश्चित केली जाणार आहेत. त्या केंद्रात धान्य विक्री करण्यासाठी येणाºया प्रत्येक शेतकºयाची माहिती गोळा केली जाणार आहेत. तसेच धान्याचे उत्पादन तपासण्यासाठी शेतीचे कागदोपत्री पुरावेही घेतले जातील. जमिनीचा आठ-अ द्यावा लागणार आहे. सोबतच शेतकºयांना त्यांच्या जातीचे स्वयंघोषणापत्रही द्यावे लागणार आहे.