क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीमुळे रस्त्याची वाट
अंढेरा : परिसरातील रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. येथून गेलेल्या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले हाेते. मात्र, अद्यापही या रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही.
जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजर करणाऱ्यांवर नजर
बुलडाणा : जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा नजर ठेवून आहे. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने धडक कारवाई करण्यात येत असून, मागील महिन्यात जिल्ह्यात तब्बल ६८ ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली होती.
वातावरणातील बदलाने वाढले आजार
मोताळा : कोरोना संसर्गामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यात आता वातावरणात वारंवार बदल होत असल्याने परिसरात विविध आजार डोके वर काढत आहेत. जलजन्य आजार वाढत आहेत; परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे नागरिकांना सध्या दवाखान्यात जाण्याची भीती आहे.
स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
बुलडाणा : सुंदरखेडमधील अनेक वॉर्डांत स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाल्या तुंबल्या असून, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधी पसरली असून, आरोग्यास धोका निर्माण होत आहे. याकडे लक्ष देऊन नाल्यांची वेळोवेळी सफाई करण्याची मागणी होत आहे.