लोकमत न्यूज नेटवर्कपळसखेड : शेत रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी गावातील पंधरा ते विस शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा ३१ मे रोजी दुसरा दिवस होता. दरम्यान वादळी पावसामुळे एक शेतकरी डोक्यात पाईप लागुन जखमी झाला आहे. मात्र तरीही उपोषणकत्यांनी आपले उपोषण सुरुच ठेवले असून,अधिकारी जोपर्यंत शेतरस्ता मंजुर करत नाहीत. तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. या उपोषण मंडपाला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनिल तायडे, रसुलखान आदींनी भेटी देऊन चौकशी केली. पाडळी येथील शेतकऱ्यांची पाडळी, गिरडा व चौथा शिवारात शेती आहे. यापुर्वी शेतात जाण्यासाठी नदी पात्राचा वापर करण्यात येत होता. परंतु या नदीत कोल्हापूरी बंधारे बांधण्यात आल्यामुळे तसेच नदीचे खोलीकरण झाल्या मुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा बैलगाडी नेण्यास अडचणी जात आहे. या बाबत महसुल प्रशासनाकडे जाऊनही मार्ग निघेनासा झाला आहे. त्यामुळे ऐन यंदाचा खरिपाच्या हंगामावर शेतकऱ्यांना उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागला आहे. कारण पेरणी करण्याकरता जावयास रस्ताच नसल्यामुळे शेतीची मशागत व पेरणी करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. तरी त्यामुळे तातडीने शेत रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसाठी येथील शेतकरी समाधान डुकरे, प्रदिप डुकरे, अभिमन्यु डुकरे, शाम पवार, सिध्दार्थ जाधव, अनिल डुकरे, गजानन डुकरे, प्रशांत पवार, रामेश्वर काळे, शालीग्राम जाधव, तानाजी डुकरे, शिवाजी डुकरे, रामदास मुळे, सुनिल जाधव, संतोष जाधव, अशोक जुंबड व सुखदेव पवार या शेतकऱ्यांनी आज ३० मे पासून गट नंबर १७२ मधील शेतात उपोषणास सुरूवात केली आहे. दरम्यान शेतरस्त्यासाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांपैकी रामदास विष्णाजी मुळे वय ६५ हे जखमी झाले आहेत. त्यांचेवर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.