- नितीन इंगळे
भालेगांव बाजार: भालेगांव बाजार येथील शेतकरी विजय प्रल्हाद हुरसाळ वय-40 वर्ष यांच्यावर सकाळी 9 वाजे दरम्यान सावरगाव बुद्रुक शिवारात शेतात काम करीत असताना. त्यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. त्यांनी आरडा-ओरड केल्यामुळे शेजारील शेतकरी धावून आल्याने त्यांचे प्राण बचावले. त्यांना जखमी अवस्थेत सामान्य रुग्णालय खामगाव येथे भरती करण्यात आले होते. मात्र सामान्य रुग्णालय खामगाव येथे औषधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले असून वैद्यकीय उपचार सुरू आहे.
वन विभागाने हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
याआधी काही महिन्यांपूर्वी पोरज, तांदुळवाडी, निमकवळा, काळेगाव, परिसरात शेतकर्यांना बिबट्याने जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. या भागात शेतकरी शेतमजूर हिंस्र प्राण्यांच्या भीतीपोटी शेतात जाण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे. शेतकऱ्यांना आपले पिके जगविण्यासाठी मोठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. तरी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या वन्य बिबट, वाघ, प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.