लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतमालाचे भाव पडले असल्याने उत्पन्न आणि उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसवितानाच शेतक-यांची दमछाक होत आहे. त्याचवेळी खामगाव तालुक्यातील शेतक-यांना पिकांच्या संरक्षणासाठी शेतक-यांची धावाधाव सुरू असल्याचे दिसून येते. वाढत्या तापमानामुळे डाळिंब आणि केळी पिकाच्या संरक्षणासाठी शेतक-यांना अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत असल्याचे चित्र परिसरात आहे.पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या झळा सोसत तालुक्यातील काही बागायतदार शेतकºयांनी डाळिंब आणि केळीचे उत्पादन घेतले आहे. ही पिके ऐन बहरावर असतानाच सूर्यदेवाची व्रकदृष्टी या पिकांवर पडली आहे. वाढत्या तापमानामुळे हातातोडांशी आलेला घास हिसकावल्या जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक असल्यामुळे गेल्याच आठवड्यात काही शेतकºयांनी आपल्या उभ्या शेतात गुरे घुसविण्याचा प्रकार समोर आला. वांगी आणि टरबूज पिके जनावरांना चारा म्हणून शेतकºयांनी खाऊ घातली. दरम्यान, परिसरातील अनेक विहिरी आटल्यामुळे मुदतीपूर्वीच काही शेतकºयांनी कांदा पीक काढले आहे. हीच परिस्थिती इतर पिकांचीही आहे. केळीला करप्या रोगाची लागण झाली असून, शेकडो हेक्टर शेतातील केळी पाण्याअभावी सुकली आहे, तर शेतातील उभ्या पिकांपासून आशा असलेल्या बोटावर मोजण्याइतक्या शेतकºयांनी उन्हापासून पिके वाचविण्यासाठी धडपड चालविली आहे. डाळिंब पिकाच्या संरक्षणासाठी काही शेतकरी ‘नॉनवॉवेन फॅब्रिक्स’चा वापर करीत आहेत. नॉनवॉवेन फॅब्रिक्स एक प्रकारचे संरक्षणात्मक आवरण असून, सूर्यप्रकाश, लहान पक्षी आणि कीटकांपासून पिकांचे संरक्षण करण्यास उपयोगी आहे.
केळीच्या संरक्षणासाठी ‘नेट’चा आधार!वाढत्या तापमानापासून केळीचे संरक्षण करण्यासाठी काही शेतकºयांनी घरगुती उपाययोजना शोधून काढली आहे. केळीचे घड करपू नये, यासाठी हिरव्या नेटचा आधार काही शेतकरी घेत असल्याचे दिसून येते. ‘नॉनवॉवेन फॅब्रिक्स’ या महागड्या उपायाला पर्यायी व्यवस्था म्हणून काही शेतकरी केळीचे घड हिरव्या नेटने झाकत आहेत. यामुळे केळी आणि काही अंशी पपई या पिकाचे संरक्षण होत असल्याचे रोहणा येथील बागायतदार शेतकरी संतोष गव्हाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.