खामगाव : शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी संकटात सापडला असून, शेतकर्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासंदर्भात अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आज गुरुवारी मोर्चा काढण्यात आला.राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी अस्मानी संकटाबरोबर सुलतानी संकटात सापडला आहे. लांबलेला पाऊस व वाया गेलेल्या पेरणी हंगामाच्या पृष्ठभूमीवर राज्यभर दुष्काळ जाहीर करा, गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या शेती पीककर्जाचे पुनर्गठण करावे, दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शेतकर्यांची बँकामधील, पतसंस्थांमधील व सावकाराकडील सर्व कर्ज माफ करावी, शेतकर्यांची वीजबिले थकबाकीसह तसेच विद्यार्थ्यांंची शैक्षणिक फी माफ करा, जनावरांच्या छावण्या सुरू करून चारा व पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था व्हावी, रेशनकार्डाचे विभाजन या व इतर मागण्यांकरिता अखिल भारतीय किसान सभा खामगाव तालुका कमिटीच्यावतीने आज १७ जुलै रोजी हा मोर्चा काढण्यात आला.शहरातील गांधी बगीचा येथून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात किसान सेनेचे राज्य अध्यक्ष दादा रायपुरे, जिल्हाध्यक्ष रामेश्वर काळे, गोपाळ गाळकर, तालुकाध्यक्ष रामचंद्र भारसाकळे, प्रकाश पताळे, डॉ. विप्लव कविश्वर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र चोपडे यांच्यासह बहुसंख्य महिला, पुरुष सहभागी झाले होते. शेवटी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले.
किसान सभेचा मोर्चा
By admin | Published: July 17, 2014 11:05 PM