- अनिल गवई
खामगाव (जि. बुलडाणा) : हिवरखेड येथील एका प्रगतिशील शेतकऱ्याने शेळीला प्रयोगशीलतेतून नवी ओळख मिळवून दिली आहे. शेतकरी, शेतमजूर आत्महत्या वाचविण्यासाठी स्वत: पुढाकार घेत ‘एक शेळी, एक झाड’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवित, अनेकांना रोजगाराचे दालन खुले करून दिले. शहरातील काही सुज्ञ नागरिकांच्याही हा फॉर्म्युला पसंतीस उतरतला आहे. शेळीचे दूध शक्तिवर्धक असल्याने पुरातन काळापासून आयुर्वेदात बकरीच्या दुधाचा उपयोग केला जातो. शेळीच्या दुधामुळे हाडातील कॅल्शियम वाढण्यास मदत होते. रक्ताची कमतरता भासत नाही, आतड्यावरील सूज कमी करण्यासोबतच बहुपयोगी औषधी गुणधर्म शेळीच्या दुधात आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शेळीला ‘गरिबांची गाय’ अशी उपमा दिली होती. हाच धागा पकडून शेतकरी, शेतमजूर जगविण्यासाठी सेंद्रिय दुधासाठी शेतकऱ्यांचा समूहगट स्थापन केला. शेतमजूर, शेतकऱ्यांना उद्भवणारी चाऱ्याची समस्या सोडविण्यासाठी पश्चिम विदर्भात पहिल्यादांच आपल्या शेतात गाररोधक यंत्र बसविणारे तथा महाराष्ट्र शासनाचे उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त, शेतकरी दादाराव हटकर यांनी ‘एक शेळी, एक झाड’ हा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरविला आहे.
शेतकरी, शेतमजुरांचा गट स्थापन!
शेतकरी, शेतमजुरांच्या आत्महत्या रोखण्यासाठी त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी दादाराव हटकर यांनी शेती गटसमूह स्थापन करून शेतकरी, शेतमजुरांना दुधासाठी शेळी आणि शेळीसाठी चारा म्हणून अंजनाचे झाड दिले. त्यांच्याकडून स्वत:च शेळीचे दूध खरेदी करीत १४ जणांना आधारासोबतच रोजगार दिला. त्यांच्या शेती समूह गटातील बकरीच्या दुधाला खामगाव शहर परिसरासह बुलडाणा, पुणे आणि गुजरात राज्यातील सूरत येथूनही मागणी होत आहे.
चिकनगुनिया काळात होती सर्वाधिक मागणी
शेळीच्या दुधात कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, कॉपर, आयरन, प्रोटिन्स, फॅट अधिक प्रमाणात आहेत. चिकनगुनिया आणि कावीळ यांसारख्या आजारावरही शेळीचे दूध गुणकारी आहे. त्यामुळे चिकनगुनियाच्या काळात या दुधाची मोठी मागणी होती. वाटेल ती किंमत देऊन शेळीचे दूध विकत घेतले जायचे. दिल्ली येथून ३६०० रुपये लिटरने आपल्या भागातील शेळीचे दूध विकले गेले होते, असेही दादाराव हटकर यांनी सांगितले. -
शेतकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘एक शेळी, एक झाड’ ही संकल्पना रुजविली. कोरोना काळात अनेकांचा रोजगार हिरावला गेला, त्यावेळी या संकल्पनेचा अनेकांना उपयोग झाला. मांसापुरत्या शेळीचा उपयोग आता आरोग्यदायी दुधासाठी होऊ लागला आहे. अंजनाच्या झाडामुळे शेळीच्या चाऱ्याचीही चिंता मिटणार आहे.
-दादाराव हटकर प्रगतिशील कास्तकार, हिवरखेड, ता. खामगाव.
बकरीचे दूध अमृततुल्य आहे. बकरीच्या दुधाच्या उत्पादनातून शेतकरी आणि शेतमजुरांना आधार देण्यासाठी मदत झाली आहे. बकरीच्या दुधाला चांगला प्रतिसाद आहे. म्हणूनच प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला १४ शेतकऱ्यांचा गट स्थापन केला असून, या माध्यमातून दुधाचे उत्पादन घेतले जात आहे.
- डॉ. अनिक खान समुपदेशक, शेतकरी समूह गट, खामगाव.