येथे पूर्वेस मोठे ब्राम्हणवाडा धरण आहे. या धरणातून खालच्या बाजूला नियमबाह्य पाणी सोडले जात असून पाटबंधारे विभागाचे देखरेख ठेवणारे कर्मचारी मनमानीपणे वाटेल तेव्हा पाणी सोडत आहेत. ब्राम्हणवाडा धरणातून नियमबाह्य पाणी सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध करून रोष व्यक्त केला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी ८ मार्च रोजी पाटबंधारे विभागात तक्रार दिली आहे.
अमडापूरच्या पूर्वेला मोठे ब्राम्हणवाडा धरण आहे. या धरणात सध्या ६० ते ७० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. याच धरणातून अमडापूर या गावाला पाणीपुरवठा करणारी मोठी नळयोजना कार्यान्वित आहे. भविष्यात या गावाला पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे उंद्री व अमडापूर येथील शेतकरी हे पण याच धरणातून पाणी घेतात. यामुळे याच पाण्याच्या भरवशावर सर्व शेतकऱ्यांनी टोळ कांदा व उन्हाळी भुईमूग, मूग या पिकाची पेरणी केलेली आहे. या पिकांना पाणी कमी पडू शकते. पाटबंधारे विभागातील कर्मचारी नियमबाह्य पाणी सोडत असल्याने शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याला विरोध केला आहे. नियमबाह्य पाणी सोडल्या जात असल्यामुळे उभ्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. पाणी सोडणे थांबवावे, अशी मागणी बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी शंतनू भारत बोंद्रे यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दिले आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव राम डहाके, माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान सुपेकर, शंतनू बोंद्रे, शेतकरी सागर कदम, गोविंद सोनुने, शेख वसिम, प्रकाश खराडे, बाबूराव सोनुने, शाम जुमडे, सुमित ढोले, सतीश पवनारकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते.