खामगाव : यावर्षी शेतकरी आस्मानी संकटाने त्रस्त झाला असतानाच ऐनवेळी पिकांना आवश्यक युरीयाची टंचाईमुळे त्रस्त झाला होता. मात्र ११ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १५0 टन याप्रमाणे युरीया उपलब्ध झाल्याने त्याचे वाटप प्रतिशेतकरी २ बॅग याप्रमाणे कृषी सहाय्यकांच्या उ पस्थितीत कृषी केंद्रावर करण्यात आले. यामुळे कृषी केंद्रांसमोर शेतकर्यांच्या रांगा लागल्या होत्या.गेल्या काही दिवसांपासून शेतकर्यांची युरीयासाठी अडवणूक केल्या जात होती. तर जादा किंमत दिली तर सहजरित्या युरीया उपलब्ध होत होता. २८१ रुपये निर्धारित किंमत असलेल्या युरीयाच्या एका बॅगसाठी शेतकरी पाहून ४00 ते ४२५ अशी मनमानीपणे कृषी केंद्रचालकांकडून विक्री करण्यात येत होती. शेतकर्यांची युरीयासाठी होत असलेली ओरड पाहता जिल्ह्यात युरीयाची ११ सप्टेंबर रोजी आवक झाली व त्याचे वितरण जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जा., मलकापूर, संग्रामपूर,मोताळा, बुलडाणा, सिं.राजा, दे.राजा, लोणार, चिखली, मेहकर अशा तेराही तालुक्यात समप्रमाणात करण्यात आले. या खताचे वितरण प्रत्येक तालुक्यात कृषी सहाय्यकाच्या उपस्थितीत प्रति शेतकरी २ बॅग याप्रमाणे करण्यात आले. जिल्हा कृषी विकास अधिकारी रमेश बर्हाड यांनी जिल्ह्यात अजूनही १0 हजार मेट्रिक टन युरीयाची गरज असून त्याप्रमाणे मागणी करण्यात आली असल्याचे सांगीतले. लवकरच पुन्हा ५ हजार मेट्रिक टन युरीया उपलब्ध होणार आहे. त्यामुळे युरीयाची टंचाई भासणार नाही.
शेतकर्यांनी रांगा लावून केली युरियाची खरेदी
By admin | Published: September 13, 2014 12:13 AM