देऊळगाव मही : प्रधानमंत्री किसान सन्मान याेजनेच्या लाभापासून बायगाव खुर्द येथील २९५ शेतकरी वंचित आहेत़ प्रशासनाकडे तसेच कृषीमंत्र्यांकडे निवेदन देऊनही मागणी मान्य न झाल्यास अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी १७ ऑक्टाेबरला संत चाेखासागर प्रकल्पाच्या पाण्यात अर्धनग्न आंदाेलन केले. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान याेजना सुरू केली आहे़ या याेजनेच्या लाभापासून बायगाव खुर्द येथील २९५ शेतकरी एक वर्षापासून वंचित आहेत़ या शेतकऱ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपयांप्रमाणे १७ लाख ७० हजार रुपये मिळालेले नाहीत. संपूर्ण गावातील शेतकरीच अनुदानापासून वंचित आहेत. आधीच यावर्षी दुष्काळी स्थिती आहे़ त्यामुळे, शेतकऱ्यांनी २९ मार्च २०२३ राेजी तहसीलदारांना निवेदन दिले हाेते तसेच ११ एप्रिलला तहसील कार्यालयासमाेर १३० शेतकऱ्यांनी उपाेषण केले हाेते.
१७ ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अर्धनग्न आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. तेव्हा प्रशासनाच्या विनंतीवरून आंदाेलन मागे घेण्यात आले हाेते. २९ सप्टेंबरला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने खडकपूर्णा जलाशयात बायगाव खुर्द शेतकऱ्यांनी १७ ऑक्टाेबरला अर्धनग्न आंदाेलन केले. या आंदाेलनात जवळपास २०० शेतकरी सहभागी झाले आहेत. या आंदाेलनात शेतकरी तेजराव मुंडे, शिवाजी काकड, संजय गाढवे,कारभारी गाढवे, जगन मांटे, अरुण शेरे, भार्गव गाढवे, रमेश डोईफोडे, विठोबा मांटे, पंडित गाढवे, गुलाबराव जाधव, मुरलीधर जायभाये, भानुदास दहातोंडे, संजय जायभाये, गजानन टेकाळे, कोंडू दहातोंडे, प्रकाश गाढवे, नरहरी खारडे, उत्तमराव गाढवे, शेख निजामभाई,भास्कर पाटोळे आदींसह इतर सहभागी झाले आहेत.
मागणी मान्य हाेईपर्यंत आंदाेलनशासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ द्यावा तसेच २९५ शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी. प्रकरणाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आंदोलन आंदोलनावर ठाम राहण्याची शक्यता आहे. या आंदोलनाचे नेतृत्व तेजराव मुंडे, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष देऊळगाव राजा हे करत आहेत.