मेहकर : समृद्धी महामार्गालगत संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. ही भिंती बांधताना रस्ता साेडणे अपेक्षी हाेते. मात्र, कंत्राटदाराने थेट शेतालगतच संरक्षण भिंती बांधल्याने शेतकऱ्यांचे रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे शेतमाल घरी कसा न्यायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, तसेच रस्त्याखाली बांधण्यात आलेल्या बाेगद्याची उंची कमी असल्याने, त्यामधून वाहने तर दूर साधे माणसेही जाऊ शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.
मेहकर तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेतजमीन आहे. या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी व त्यांचा शेतमालाचे दळणवळण करण्यासाठी शेतरस्त्यांची तरतूद केलेली आहे. असे असतानाही कंपनीमार्फत मात्र सदर शेतरस्ता न सोडता त्यावर संरक्षण भिंत घालण्याचा घाट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणासाठी रस्ताच नसल्याने समृद्धी महामार्ग शेतरस्ता संघर्ष समितीच्या वतीने सदर काम हे आंध्रुड येथे सुरू होतातच बंद पाडण्यात आले आहे. याबाबत शेतरस्ता संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले. त्यांना वस्तुस्थितीची जाणीवही करून देण्यात आली आहे. मात्र, मुजोर अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत अद्यापही रस्त्याच्या बाबतीत हा प्रश्न सोडविला नाही. भविष्यात शेतरस्ता सोडला नाही, तर यामध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसणार आहे. यासोबतच शेतातील नैसर्गिक पद्धतीने वाहणारे पाणी यालाही अडसर निर्माण होऊन हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात थांबणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
शेतात वाहने नेण्यासाठी कसरत
काही ठिकाणी समृद्धी महामार्गाला रस्ता ओलांडण्यासाठी बोगदे ठेवण्यात आले आहेत. मात्र, सदर बोगद्याची उंची कमी ठेवण्यात आली असल्यामुळे शेतीतील वाहने, जसे की ट्रॅक्टर ट्रॉली, हार्वेस्टर यांसारखी उंची असलेली वाहने या बोगद्यामधून जात नाहीत. या शिवाय सदर बोगदे हे शेतजमिनीपेक्षा खोल असल्यामुळे पावसाळ्यात या बोगद्याद्वारे पाणी वाहून जाण्यासाठी, त्याचप्रमाणे पाणी थांबण्यासाठी याचा वापर होईल. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा काहीच उपयोग होणार नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
गावरस्तेही झाले बंद
खंडाळा ते पिंर्प्री माळी, अंजनी बुद्रुक ते उमरा, आंध्रुड ते डोणगाव ही गावे एकमेकांना शेत रस्त्यांच्या माध्यमातून जोडला जात होती. मात्र, सदर रस्ता समृद्धी महामार्गाने बंद केला असून, या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रस्ता कसा ओलांडायचा, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.
समृद्धी महामार्ग प्रोजेक्टमध्ये तरतूद असलेला शेतरस्ता सोडून सदर कंपनीने संरक्षण भिंतीचे काम करावे, अन्यथा हा प्रश्न जोपर्यंत निकाली लागणार नाही, तोपर्यंत आम्ही संरक्षण भिंतींचे काम बंद पाडू.
- प्रदीप देशमुख ,अध्यक्ष, समृद्धी महामार्ग शेतरस्ता संघर्ष समिती, मेहकर