कोरोनाचे नियम पाळून भीम जयंती साजरी करा
अंढेरा : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतरत्न डाॅ़. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नियमांचे पालन करून आनंदात साजरी करावी, असे आवाहन स्वारीचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पैठणे यांनी केली आहे.
नांद्राकाेळी येथे महात्मा फुलेंना अभिवादन
बुलडाणा : नांद्राकोळी येथे महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी दलित मित्र माधवराव हुडेकर, सरपंच संजय काळवाघे, उपसरपंच मनोज जाधव तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य आदी उपस्थित हाेते.
महात्मा फुले यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी
डाेणगाव : क्रांतिसूर्य महात्मा फुले म्हणजे परिवर्तनाची धगधगती मशाल होते. महात्मा फुले यांचे विचार आणि कृती आजही अनेकांना प्रेरणा देते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेले काम हे इतिहासाच्या पानावर नेहमीच अतुलनीय ठरले आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले समता परिषदेचे मेहकर तालुकाध्यक्ष संदीप पांडव यांनी केले.
स्वस्त धान्य दुकानदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
माेताळा : महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने ५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. राज्यातील ५५ हजार स्वस्त धान्य दुकानदारांनी कोरोना महामारीच्या काळात शासनाकडून कोणत्याही प्रकारे मदत न मिळता अविरत सेवा दिली आहे. त्यांना विम्याचे संरक्षण व इतर मागण्यांचा समावेश निवेदनात केला आहे़
लाॅकडाऊनचे उल्लंघन, हाॅटेल मालकावर गुन्हा
अंढेरा : काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी शनिवार आणि रविवारी वीकेंड लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. या लाॅकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर अंचरवाडी फाट्यावरील एका हाॅटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काेराेना संसर्ग वाढत असताना ग्रामस्थांमध्ये गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.
पाेकराअंतर्गत ३५४ शेतकऱ्यांना लाभ
बुलडाणा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील ३५४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. जिल्ह्यातील ४१३ गावांमधील शेतकरी या प्रकल्पांतर्गत सुखी, समृद्ध हाेण्यास मदत झाली आहे.
अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा
सिंदखेड राजा : तालुक्यातील ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून अवैध दारू विक्री माेठ्या प्रमाणात सुरू आहे. दारु विकत घेण्यासाठी बाहेरगावातील लाेक गर्दी करीत असल्याने काेराेना संसर्ग पसरण्याची भीती आहे. त्यामुळे अवैध दारु विक्री बंद करण्याची मागणी हाेत आहे.
सुतारकाम करणाऱ्यांना आर्थिक मदत द्या
साखरखेर्डा : लाॅकडाऊनमुळे सुतारकाम करणाऱ्या कारागिरांवर आर्थिक संकट आले आहे. सिंदखेड राजा तालुक्यात सुतार व्यवसाय करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. कामे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
पार्किंगची व्यवस्था करा
बुलडाणा : प्रशासकीय इमारतीमध्ये विविध कार्यालये आहेत. इमारत परिसरात पार्किंगची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनधारक कुठेही आपली वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी संदीप गायकवाड यांनी केली आहे.
खरीप पीक विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
धामणगाव बढे : खरीप हंगाम संपून पाच महिने लोटले असताना सुद्धा व शेतकऱ्यांचेे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेे असताना पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना कवडीचीसुद्धा मदत पीक विमा कंपनीकडून झाली नाही. शासन स्तरावरसुद्धा कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही.