बुलडाणा: सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे फळबागा जगविणे अवघड झाले असून फळबागांच्या व्यवस्थापनासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. उन्हाळ्यात किंवा दुष्काळी परिस्थितीत फळबागा वाचविण्यासाठी सुक्ष्म सिंचन मुख्यत: ठिबक पध्दतीचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ५० ते ६० टक्के पाणी बचत होते. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक या योजने अंतर्गत अल्प, अत्यल्प भूमीधारी शेतकरी व अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकºयांना एकूण खर्चाच्या ५५ टक्के अनुदान व इतर शेतकºयांना ४५ टक्के अनुदान देण्यात येते. राज्यात प्रामुख्याने नारळ, चिकु, सुपारी, केळी, पपई, पेरु, द्राक्ष, डाळींब, सिताफळ, लिंबू, मोसंबी, संत्रा, आंबा, सिताफळ, बोर, आवळा, पपई आदी फळपिके घेतली जातात. दुष्काळी परिस्थिीमुळे कृषी विभागाकडून सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करावा व कमीत कमी पाण्यामध्ये आपल्या फळबागा टिकवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाळ्यामध्ये मटका सिंचनद्वारे फळबागा जगविणे शक्य आहे. फळबागांच्या वयोमानानुसार प्रतिझाड पाच लिटर क्षमतेचे दोन ते चार मटक्याचा उपयोग करावा. मटक्याच्या तळाशी छिद्र पाडून त्यामध्ये कपड्याची गाठ बसवून मटक्याचे तोंड जमिनीच्या दोन इंच वर राहील, अशा बेताने ज्या भागात झाडाची तंतुमय मुळे जास्त प्रमाणात असतील. (दुपारी १२ वाजता झाडाच्या सावलीच्या आतील बाजूस) पुरवावे. यामुळे आवश्यकते नुसार व सतत झाडाला पाण्याचा पुरवठा होत राहील, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. ठिबक सिंचनासोबत आच्छादनाचा वापर केला तर प्रखर सूर्यप्रकाशामुळे व अधिक तापमानामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन आटोक्यात येईल. जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहील व जमिनीची धूपदेखील कमी होईल. आच्छादनासाठी वाळलेले गवत, पालापाचोळा, सोयाबीनचा भुसा, ऊसाचे पाचट, गव्हाचे काड, केळीची वाळलेली पाने, तुरकाड्या, लाकडाचा भूसा आदींचा उपयोग करता येतो. अशा नैसर्गिक आच्छादनाची जाडी ही १२ ते १५ सेमी असावी व हे आच्छादन झाडाच्या पूर्ण परिघात करावे, अशी माहिती कृषि विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
फळबागांच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 5:47 PM