परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे आपल्या भागामध्ये कमी कालावधीत होणारे पिकाचे वाण घेवडा, वाल, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन यांचे फळबागेत आंतरपीक म्हणून घेतल्यास जमिनीची धूप कमी होते. आंतर पिकाच्या वाढणाऱ्या मुळांमुळे पाण्याचा निचरादेखील चांगल्या पद्धतीने होऊन जमीन लवकर वापशावर येते. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारी पिके भुईमूग, उडीद, मूग, सोयाबीन, वाल याचा समावेश शेतकरी करीत आहेत. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि याचा अनुकूल परिणाम होतो. या उद्देशाने परिसरातील एका शेतकऱ्याने शेतातील फळबागेत वाल हे आंतर पीक म्हणून लागवड केली आहे. यासाठी अगोदर फळबागेत झाडांच्या बाजूने चहूबाजूने दीड फूट जागा सुटेल अशा पद्धतीने रोटाव्हेटरने जमीन भुसभुशीत करून घेतली आणि त्यामध्ये लाईन पद्धतीचा अवलंब करून ठिबक आच्छादन करून घेतले. ठिबकद्वारे पाणी सोडून जमीन ओली करून घेतली व आंतर पीक म्हणून वाल लागवड केली.
यामुळे शेतकऱ्याला आंतर पीक फायदेशीर ठरेल.
आंतर पिकाने जमिनीची धूप कमी होते.
सरासरीपेक्षा पाऊसमान कमी झाल्यास कमी कालावधीत येणारी आंतर पिके निश्चित फायदा देतात. सरासरीपेक्षा पाऊस जास्त झाल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यास धूपरोधक आंतर पिके जमिनीची धूप कमी करतात. यामुळे पाण्याचा निचरा लवकर होतो. सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त कोणत्याही प्रकारचा पाऊस असला तरी आंतर पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यास हमखास उत्पादन येण्यास हमी असते. जमिनीचे क्षेत्रफळ कमी असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असे अंतर्गत पीक घेत आहेत.