फायर ऑडिटचा प्रश्न पडला मागे
बुलडाणा : शासकीय, खासगी रुग्णालयांनी फायर ऑडिट करून घेण्याबाबत मध्यंतरी जिल्हा प्रशासनाने आदेश पारित केले होते. मात्र, कोरोनाच्या धामधुमीत प्रशासनास आता त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. अनेक कार्यालयांनी अहवालही सादर केलेला नाही. याप्रकरणी कुठलीच ठोस कार्यवाही अद्याप झालेली नाही.
पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी !
सिंदखेड राजा : तालुक्यात अतिवृष्टीमुळे असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले हाेते. पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही. त्यांना त्वरित लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे !
किनगाव राजा : जिल्हाभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, मोबाईल, संगणक सुविधा असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. किनगाव राजा परिसरात याची अंमलबजावणी सुरू आहे.
पावसाळा आला, पण पाणंद रस्त्यांचा प्रश्न कायम
बुलडाणा : परिसरातील पाणंद रस्त्यांना आमदार निधीतून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या सुटत आहे. परंतु अनेक भागात मंजुरी मिळून अद्यापही या रस्त्याच्या कामांचा प्रश्न सुटला नाही. पावसाळ्यात पाणंद रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बसस्थानक परिसरात वराहांचा सुळसुळाट
मेहकर : शहरातील बसस्थानक परिसरात गत काही दिवसांपासून वराहांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे, प्रवासी त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन डुकरांचा बंदाेबस्त करण्याचे आदेश देण्याची मागणी हाेत आहे.