बुलडाणा, दि. २0- विदर्भासह संपूर्ण राज्यातील शेतकर्यांची अवस्था बिकट आहे. त्यांच्यावर कर्जाचा बोझा असल्याने आत्महत्या वाढत आहेत. शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता सुरुवातीला त्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी शुक्रवारी वानखेड येथे पार पडलेल्या सभेत दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढणार आहे. त्यामुळे खा. राजू शेट्टी यांच्या सभांचे आयोजन संग्रामपूर, शेगाव व खामगाव तालुक्यात करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश चोपडे, प्रशांत डिक्कर, कैलास फाटे, श्याम अवसळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. शेट्टी म्हणाले, की निसर्गाच्या अवकृपेमुळे यावर्षी शेतकर्यांची अवस्था बिकट आहे. त्यांना भरघोस मदतीची गरज आहे. सध्या राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत पैसे व दारूचा वापर करणार्या उमेदवारांना धडा शिकवा. भ्रष्ट पुढार्यांना निवडणुकीत पराभतू करा, त्यामुळे नेते भ्रष्टाचार करणार नाहीत. शेतकर्यांसाठी कार्य करणार्या वेळप्रसंगी प्राणाची आहुती देण्यास तयार असणार्या नेत्यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीत अमाप खर्च न करता, दारू व पैशांचे वाटप न करताही निवडणुका जिंकता येतात, हे मी निवडून येऊन सिद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले. ना. रविकांत तुपकर आपले मत व्यक्त करताना म्हणाले, की शेतकर्यांनी शेतकर्यांची विशेष व्होट बँक तयार करायला हवी. शेतकरी हे शेतीच्या मुद्यावर निवडणुकीत मतदान करीत नाहीत. त्यामुळे त्यांची मते विभागल्या जातात. तसेच आगामी निवडणुकीत स्वाभिमानी संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे ना. तुपकर यांनी सांगितले.
शेतक-यांना कर्जमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - राजू शेट्टी
By admin | Published: January 21, 2017 2:38 AM