साखरखेर्डा : साखरखेर्डा आणि परिसरात १५ जूनला रात्री पडलेल्या पावसाने शेततळे फुटले असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. या नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
साखरखेर्डा मंडळात १५ जूनला ७४ मिमी पाऊस झाला होता. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने बांध फुटले. प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे शेतजमीन खरडून गेली आहे. मोहाडी येथील विशाल भारत रिंढे यांची गट नंबर १४३ मध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने सर्व बांध फुटले. ते पाणी शेत तलावात गेल्याने शेत तलाव फुटला. यात त्यांचे १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. शेतात सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आला होता. त्या सौरऊर्जा प्रकल्पाचे नुकसान झाले आहे. मोहाडी येथील नदीकाठच्या शेकडो एकर शेतात पाणी घुसल्याने शेत जमीन खरडून गेल्या आहेत. या नुकसानीचा तहसीलदार सुनील सावंत आणि तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी सर्व्हे करून अहवाल शासनाला पाठवावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी तेजराव देशमुख, शिवदास रिंढे यांनी केली आहे़