लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : देशबांधवांच्या मनातील संस्कृती संवर्धीत सशक्तराष्ट्र, बलशाली भारत घडविण्यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टींकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधले जावे, म्हणून माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव गाडेकर गुरूजी यांनी धनत्रयोदशीच्या ५ दिवसांच्या लाक्षणिक उपवास आंदोलनास प्रारंभ केला. स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर सोमवारी दुपारी या अनोख्या लाक्षणिक आंदोलनाला सुरूवात झाली.
देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून काही देशबांधवांच्या भावना जाणून घेतात या अनुषंगाने सशक्त राष्ट्र घडविण्यासाठी समाजसेवक वसंत गाडेकर गुरुजी यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जनहितार्थ न्याय्य मागण्यांवर प्रकाश टाकला आहे. यामध्ये शिक्षकांसंबंधी आरटीई अॅक्टमधील कठोर बाबी मागे घेऊन संस्कृती संवर्धनासाठी शिक्षकांकडे फक्त प्रभावी अध्यापनाचेच कार्य द्यावे व शिक्षक न्याय्य हक्क संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा आणावा, भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र भारतीय चलनी नोटांवर छापून त्यांना गौरविण्यात यावे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले व माता सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, देशातील शेतक?्यांच्या कल्याणासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, वयाची ६० वर्ष पूर्ण करणाºया नागरीकांना ‘वृद्धापकाळ ’ पेन्शन योजना लागू करण्यात यावी, केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचा-यांना जूनी पेन्शन योजना कायम ठेवण्यात यावी, यासह देशाच्या सीमेवर अहोरात्र लढणाºया भारतीय सैन्य दलातील शहीदांच्या कुरूंबियांकडे विशेष लक्ष देण्यात यावे आदी १२ मागण्यांचा समावेश आहे. त्यांच्या या लाक्षणिक आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.