बुलडाणा : शासनाचे आदेश असतानाही अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती न मिळाल्याने बुलडाणा जिल्हा परिषदसमोर ८ आॅक्टोबर पासून उपोषण सुरू आहे. दरम्यान, दुसºया दिवशीही हे उपोषण सुरूच होते. शासनाचे अनुकंपाभरती बाबतचे स्पष्ट निर्देश असतानाही बुलडाणा जिल्हा परिषद प्रशासनाने वेळकाढू धोरण अवलंबले आहे. त्यामुळे अनुकंपा यादीतील बरेच उमेदवार वयाची ४५ वर्ष उलटून गेल्याने यादीमधून बाद झाले आहेत. परिणामी त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनुकंपा भरती वरील निर्बंध उठल्यानंतर प्रत्येक वर्षी दहा टक्के पदे भरती करणे आवश्यक असतानाही २०१४ नंतर बुलडाणा जिल्हा जिल्हा परिषदेने एकही पद अनुकंपा तत्त्वावर भरले नाही. याबाबत मुख्यमंत्री, ग्राम विकास मंत्री, पालकमंत्री, वित्त मंत्री यांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून पत्रव्यवहार केल्यानंतर २ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांना अनुकंपा भरती बाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत लेखी निर्देश देण्यात आलेले आहेत. परंतू त्यावर बुलडाणा जिल्हा परिषदेकडून कोणत्या प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. शासन निर्णयानुसार पद भरतीवर निर्बंध असेपर्यंत गट ‘क’ व गट ‘ड’ मधील एकूण रिक्त पदांच्या २० टक्के पदे अनुकंपा मधून भरण्याची परवानगी दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये इतर विभागाची २०१४ पर्यंत अर्ज करणाºया उमेदवारांना नियुक्ती आदेश दिल्याचे समजते. परंतु बुलडाणा जिल्हा परिषदेला कोणत्या आदेशाची प्रतीक्षा आहे, असा प्रश्न उपस्थित करून अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती न मिळाल्याने जिल्हा परिषदसमोर पवन विजय पवार, अजिंक्य शिंदे, संदीप गायकवाड, प्रविण शिंगणे यांनी उपोषण सुरू केले आहे.
अनुकंपा तत्त्वावर नियुक्त न मिळाल्याने उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 6:01 PM