लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकरी संघटनेचे प्रणेते दिवंगत शरद जोशी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त ३ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांसह संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अभिनव उपोषण आंदोलन करण्यात आले. यावेळी आयोजित परिसंवादात शेतकरी समाजाच्या उद्धारासाठी शरद जोशी यांनी मांडलेल्या अर्थशास्त्राची देशाला गरज असल्याचे भूमिका नामदेव जाधव यांच्यासह विविध पदाधिकार्यांनी व्यक्त केली. स्व. शरद जोशी यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी ११ वाजेपासूनच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते येथील जयस्तंभ चौकातील गांधीभवन येथे जमा झाले होते. १२ वाजेच्या सुमारास स्व. शरद जोशी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जोशी यांच्या प्रतिमेची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. जयस्थंभ चौक येथून स्टेट बँक चौक मार्गे संगम चौक ते गांधी भवन मार्गे निघालेल्या मिरवणुकीत ‘इडा पीडा टाळणार आहे, बळीचे राज्य येणार आहे’, ‘भीक नको हवे घामाचे दाम’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.मिरवणूक गांधी भवन येथे दाखल होताच शेतकर्यांच्या सरसकट कर्जमाफी आणि वीज बिल मुक्तीसाठी एक दिवसीय उपोषणाला सुरुवात करण्यात आली. ‘मी अनुभवलेले शरद जोशी’ या परिसंवादात नामदेव जाधव यांनी शेतकरी समाजाच्या उद्धारासाठी शरद जोशी यांनी मांडलेल्या अर्थशास्त्राची आज देशाला गरज असल्याचे सांगून जोशी यांच्या विचारांशिवाय शेतकर्यांना ‘अच्छे दिन’ येऊ शकणार नसल्याचे सांगितले. अव्यहारी स्वामिनाथन आयोगापेक्षा स्व. शरद जोशी यांच्या कृषी कृती दलाचा अहवाल लागू करण्याची मागणीही जाधव यांनी यावेळी केली. डॉ. हासन देशमुख यांनी कर्जमाफीवरून सरकारचा खरपूस समाचार घेत फसव्या कर्जमाफीपेक्षा शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली. एकनाथ पाटील यांनी शरद जोशी यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकला. यावेळी देवीदास कणखर, विनायक वाघ, आशा धूड, मंदा अंभोरे, रेखा खांडेभराड, उषा थुटे, समाधान कणखर, रविराज शेळके, दामोधर शर्मा, ज्ञानेश्वर जाधव, सुरेश दादा यांच्यासह इतरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पवन देशमुख, प्रदीप गोरे सुंदरखेड यांनी नामदेव जाधव व डॉ. हासन देशमुख यांच्या मार्गदर्शनात शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष सुरेश सोनुने, सुभाष गिरी, ज्ञानेश्वर जाधव, डॉ. विनायक वाघ, प्रकाश अंभोरे, विजय गायकवाड, सादिक देशमुख, कलीम सेठ, शिवाजी सोनुने, बाबुराव पाटील, हरिदास खांडेभराड, संतोष राजपूत, तन्वीर देशमुख, नवृत्ती साळवे, अनिल मिसाळ, सुगदेव नरोटे, दासा कणखर, मुजमुळे, शेषराव पाटील, भिका सोलनकी, पका घुबे, मुरली महाराज येवले, राजू शेटे, मधुकर गहुभे, देवीदास भगत, राजू पाटील, रतिराम शेळके, बडे, भानुदास गहुभे, विजयकुमार डागा, मदन लखाने, प्रल्हाद ठाकूर, शरद सावजी, तेजराव मुंडे, मेरत, पवार, प्रद्युमन सोनटक्के, दिनकर टेकाळे, मधुकर देठे, रमेशसिंग चव्हाण, दिगंबर चिंचोले आदी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते, पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
फुगड्या खेळत शरद जोशी यांचा जन्मोत्सव साजरामिरवणुकीदरम्यान शेतकरी नेते नामदेव जाधव, शाहीर खांडेभराड यांनी हलगीच्या तालावर ताल धरत फुगडी खेळून मिरवणुकीला रंगत आणली. त्यानंतर संघटनेच्या शेतकरी महिलाही मागे राहिल्या नाही. हलगीच्या तालावर एकमेकांच्या हातात हात गुंफत महिलांनी फुगड्या खेळून स्व. जोशी यांचा जन्मोत्सव साजरा केला. हलगीच्या तालावर रंगलेल्या महिला-पुरुषांच्या फुगड्या लक्षवेधी ठरल्या.