लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तूर खरेदी काळात विना टोकन तूर मोजमाप होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केले होते; परंतु चिखली सहकारी संस्था सहायक निबंधक यांनी याबाबत कारवाई न करता चुकीचा निर्णय दिल्याची तक्र ार स्वाभिमानीचे दीपक सुरडकर यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे देऊन महिना उलटूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ७ जुलै रोजी जिल्हाउपनिबंधक यांची भेट घेऊन चुकीचा निर्णय देणारे सहायक निबंधक व संबंधित दोषींवर चार दिवसात कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला.शासनाने तुरीला हमीभाव देऊन नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू केली होती. काहींनी याचा फायदा घेत आपली तूर जलदगतीने कशी मोजता येईल, यावर कर्मचाऱ्यांना हाताशी धरून विना टोकन तूर मोजण्याचा प्रकार चिखली नाफेड केंद्रावर होत असल्याची माहिती मिळताच २०० पोते तूर विना टोकन मोजमाप होत असल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यानी उघड केला होता. सर्व घटनेचा सहायक निबंधक रूद्राक्ष यांनी पंचनामा केला होता. त्या पोत्यांपैकी मोजमाप झालेली २९ क्विंटल तूर जप्त करण्यात आली होती. तर विना टोकन मोजमाप झालेले पोते कुणाचे, याची कबुली खरेदी-विक्रीच्या व्यवस्थापकांनी इनकॅमेरा दिली होती. मापारी यांच्याकडे जप्त केलेल्या पोत्याची नोंद काळे नावाने आहे. तरीसुद्धा पंचनाम्यातील पंचांना व तक्रारकर्ते दीपक सुरडकर यांना चौकशीदरम्यान विचारात न घेता पोत्यांचा बनावट मालक तयार करून त्या बनावट मालकाच्या शेतात तूर पेरलेली आहे का, याची कुठलीही विचारपूस न करता तलाठ्याने दिलेले पेरेपत्रक खरे की खोटे, याची शहानिशा न करता सातबारा ग्राह्य धरला कसा व बाजार समितीकडे या पोत्यांची नोंद नसल्याचे उघड झाले होते. सहायक निबंधक यांनी मनमानी निर्णय देत उर्वरित पोते बनावट मालकाच्या नावे मोजण्याचे पत्र दिले होते. तर ऐकीकडे तूर खरेदी बंद असताना रात्री उशिरा पोते मोजत असल्याचेही उघड झाले होते. चुकीचा निर्णय देणाऱ्या सहायक निबंधकांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते; परंतु यावर महिनाभराचा कालावधी उलटूनही दोषींवर कारवाई होत नसल्याने मूळ मालक, बनावट मालक व संबंधित दोषी अधिकारी व चुकीचा निर्णय देणारे चिखली सहायक निबंधक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असून, चार दिवसांचा अल्टिमेटम निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानीचे संतोष राजपूत, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, दीपक सुरडकर, विलास तायडे, पंकज पळसकर, अनिल चौहान, भरत जोगदंडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
विना टोकन तूर मोजणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास उपोषण
By admin | Published: July 10, 2017 12:59 AM