शेगाव : शहरातील खम्मु जमदार नगरातील एका मशिदीच्या खोलीत रविवारी पहाटे १९ वर्षीय युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेसंदर्भात मृतकाच्या आईने पोलिसांत तक्रार दिली असून बापानेच मुलाचा खुन केल्याचा संशय व्यक्त केला. तपासाअंती शहर पोलिसांनी बापाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शहरातील गरीब नवाज मशिदमध्ये पहाटे ५ वाजेच्या सुमारास अजान देण्याकरिता सय्यद वली सय्यद महेबुब हे गेले असता त्यांना मजिदमधील एका खोलीत एक युवक झोपलेला दिसून आला. सय्यद वली यांनी इतर दोघांच्या मदतीने त्यास उठविण्याचे प्रयत्न केले, मात्र तो मृत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मृतक मो.सलीम शे.कासम, वय १९ वर्षे हा स्थानिक खम्मु जमदार नगर येथील रहिवासी असल्याचे समजले. नातेवाइकांनी घटनेची माहिती शहर पोलिसांत दिली. मृतकाची आई जैबुन्निसा कासम शेख यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली. मृतकाचा बाप शे.कासम शे.गफूर यानेच मुलाचा खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. तक्रारीनुसार आरोपीची पत्नी व मृतकाची आई ही मागील १५ दिवसांपासून माहेरी माटरगांव येथे तिची दोन मुले व चार मुलींसह राहायला गेलेली होती. तर सलिम बहिणीचे लग्न असल्याने १५ मे रोजी शनिवारी मसाला खरेदी करण्यासाठी शेगावला गेला होता. त्यावेळी त्याने शेगावी मुक्काम करणार असल्याचे आईला सांगितले होते. त्यानंतर १६ मे रोजी मृतकाच्या मामाच्या मोबाईलवर शेगाव येथून फोन आला की त्याचा भाचा शे.सलिम हा गरीब नवाज मशिदच्या स्टोअर रूममध्ये मरण पावलेला आढळून आलेला आहे. माहिती मिळताच फिर्यादी तिची मुलगी शमिम व मुलगा मो.उमर यांचेसोबत सकाळी शेगाव येथे पोहोचली. पती शे.कासम नेहमीच फिर्यादीला व मुलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यावरून बापानेच मुलाचा खून केल्याचा संशय फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला.
पोलिसांनी बापाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनात पोउनि नितीन इंगोले हे करीत आहेत.