खामगाव : पोटच्या मुलीचा वाईट उद्देशाने विनयभंग केल्याप्रकरणी खामगाव तालुक्यातील माक्ता येथील ५८ वर्षीय नराधम पित्यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. खामगाव तालुक्यातील माक्ता येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ११ जून २०१८ रोजी घरात खाटेवर झोपली होती. रात्री १ वाजता दरम्यान तिच्या नराधम बापाने वाईट उद्देशाने विनयभंग केला. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी मुलीने १३ जून २०१८ रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात पित्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध भादंविच्या विविध कलमासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तपास पीएसआय बालाजी महाजन यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. न्यायालयाने ९ साक्षीदार तपासले. त्यामध्ये मुलीची साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश आर.डी. देशपांडे यांनी आरोपी पित्याला वेगवेगळ्या गुन्ह्यात ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा तसेच अडीच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाकडून अॅड. रजनी बावस्कार यांनी काम पाहिले.
मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्याला तीन वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 6:44 PM