लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : आमदार श्वेता महाले यांचे सासरे आणि विद्याधर महाले यांचे वडील स्व. दयासागर महाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या सावडण्याचा दिवशी वटवृक्ष, रक्तचंदन, पारिजातक, आंबा आदी वृक्षांची लागवड करून त्या वृक्षांच्या माध्यमातून स्व. दयासागर महाले यांच्या स्मृती जपण्याचा स्तुत्य उपक्रम महाले परिवाराने राबविला आहे.
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर स्व. दयासागर महाले यांच्या निधनानंतर त्यांच्या सावडण्याचा कार्यक्रम महाले परिवाराने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घरगुती स्वरूपातच पार पाडला. दरम्यान, महाले परिवाराच्या शेतात पार पडलेल्या सावडण्याच्या कार्यक्रमापश्चात विविध वृक्षांची लागवड करून त्यांच्या स्मृती जोपासण्यासह पर्यावरणाविषयी जनजागृती संदेश यानिमित्ताने महाले परिवाराने दिला आहे. दरम्यान, स्व. दयासागर महाले यापुढे वृक्षांच्या रूपाने सदैव सोबत राहणार आहेत, याचप्रकारे सर्वांनी स्वकीयांच्या स्मृती जोपासण्यासाठी वृक्षारोपण करण्याचा संदेश याद्वारे देण्यात आला आहे. स्व. दयासागर महाले यांच्या पत्नी पुष्पलता महाले, विद्याधर महाले, मिलिंद महाले, श्रीधर महाले ही तीन मुले व आ. श्वेता महाले, भाग्यश्री महाले आणि श्रद्धा महाले या तीन सुनांच्या हस्ते स्व. दयासागर महाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली.
कॅप्शन : वृक्षारोपण करताना महाले कुटुंबीय.
..............................