लोणार(जि. बुलडाणा), दि. १४ : तालुक्यात वर्षभरापासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची मेंटेनन्स एजन्सी नसल्यामुळे अनेक शेतशिवारात विद्युत तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटून पडलेल्या आहेत. ऐन पावसाळ्यात अशा भयानक परिस्थितीमुळे जीवित हानी व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोणार तालुक्यात पानस शिवारात गेल्या महिनाभरापासून खांबावरील विद्युत तारा तुटून पडलेल्या आहेत. याबाबत शेतकरी ज्ञानेश्वर रुस्तमराव मापारी यांनी विद्युत वितरण कंपनीच्या तक्रार नोंदवहीत महिनाभरापूर्वी तक्रार नोंदविली. तसेच याबाबत वारंवार तोंडी पाठपुरावाही केला. परंतु कर्मचारी नसल्याचे सांगून कर्तव्यापासून हात झटकण्याचे काम उपकार्यकारी अभियंता मुचलवार यांनी केल्याचा अनुभव ज्ञानेश्वर मापारी यांना आला. याबाबत मुचलवार यांना विचारणा केली असता काही दिवसातच काम करवून देतो, असे आश्वासन त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीला दिले. परंतु दोन महिन्याचा कालावधीनंतरही विद्युत तारा लोंबकळलेल्या असल्यामुळे शेतकर्यांमध्ये जीवित हानी व वित्त हानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. विद्युत तारा तुटून पडलेल्या असल्यामुळे शेतामधील वीज पुरवठाही खंडित झालेला आहे. यामुळे शेतकर्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी घरुनच वा विकत पाणी घ्यावे लागत आहे. विद्युत वितरण कंपनीचा चाललेल्या भोंगळ कारभाराकडे जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी लक्ष देऊन शेतकर्यांसाठी ठोस पावले उचलावी, अशी मागणीही शेतकरी ज्ञानेश्वर मापारी यांनी केली आहे.
तुटलेल्या विद्युत तारा ठरताहेत जीवघेण्या!
By admin | Published: August 15, 2016 2:36 AM