- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एफडीएच्याबुलडाणा येथील गोडाऊनमधून दोनदा जप्त केलेला गुटखा चोरी झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर एफडीएने केलेल्या कार्यवाहीतील जप्त गुटख्याची पडताळणी करून प्रत्यक्षात किती गुटखा चोरीला गेला याचा अहवाल इन कॅमेरा पडताळणी करून देण्याचे पोलीस प्रशासनास पालकमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. मात्र पीआय, एपीआय दर्जाचे दोन अधिकारी यांच्यासह अर्धाडजन पोलीस कर्मचारी सध्या दोन दिवसांपासून जप्त गुटख्याची पडताळणी करून तो सील बंद करत आहेत. मुळात एफडीएने कारवाई करताना अपेक्षीत पथ्थे न पाळल्यामुळे अगदी शुन्यातून पोलीसांना ही प्रक्रिया पारपाडावी लागत असल्याने हे पंचनामे गुंतागुंतीचे बनले आहे.एफडीचेच्या बुलडाणा येथील गोडावूनमधून दोन लाख ८० हजार रुपयांचा जप्त केलेला गुटखा चोरीला गेला होता. त्यानंतर १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान पुन्हा या गोडावूनमध्ये चोरीचा प्रयत्न झाला होता. याची कुणकूण लागताच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी १४ फेब्रुवारीला रात्रीच अचानक एफडीएच्या बुलडाणा कार्यालयाची झडती घेतली. जप्त केलेला गुटखा आणि प्रत्यक्ष चोरी गेलेला गुटखा याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. बुलडाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंके, एपीआय अभय पवार, पीएसआय अमित जाधव व पोलिस कर्मचाऱ्यांनी शनिवारीच जप्त केलेल्या मालाची मोजदाद इन कॅमेरा करीत गुटखा सिलबंद केला. मात्र मुळातच एफडीएने गुटखा जप्तीची कारवाई करताना त्याची नोंद व जप्तीची कार्यवाही योग्य पद्धतीने केली नाही. त्यामुळे पोलिसांना पंचना व पडताळणी कारवाई करणे अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे.मंगळवारी देणार अहवालबुलडाणा शहर पोलिस सोमवारी उर्वरित गुटख्याची मोजणी करून प्रत्यक्ष जप्त केलेला गुटखा व चोरी गेलेला गुटखा याची तफावत स्पष्ट करणार आहेत. तसा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून वरिष्ठांना सादर करण्यात येणार येणार आहे.दोघांचे पदभार काढलेबुलडाण्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न) अनिल राठोड आणि अन्न सुरक्षा अधिकारी एन. एम. नवलकार यांचा पदभार १३ फेब्रुवारी रोजीच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त ए. बी. उन्हाळे यांनी काढला असून त्यांच्या जागी अनुक्रमे अमरावती येथील सहाय्यक आयुक्त (अन्न) एस. डी. केदारे आणि मुंबई मुख्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी आस. डी. सोळंके यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांना आता अमरावती येथील कार्यालयाच्या नियंत्रणात काम करण्याचे निर्देशीत केले आहे.
‘एफडीए’ने जप्त केलेल्या गुटख्याचे पंचनामे गुंतागुंतीचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 3:31 PM