लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जन्म-मृत्यू नोंदणी आणि जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळविणे सामान्यांसाठी एक कसरत ठरते. अनेकांना यासाठी जन्म-मृत्यू कार्यालयात हेलपाटे आणि चकरा माराव्या लागतात. मात्र, खामगाव पालिकेतील जन्म-मृत्यू विभागाच्या संवेदनशील कामगिरीने सामान्यांना जन्म-मृत्यू नोंदणी आणि प्रमाणपत्र मिळविणे सुलभ झाले आहे. त्याचवेळी अभिप्राय पुस्तिकेच्या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून या कार्यालयाने कामकाजात आमुलाग्र सुधारणा केली आहे.केंद्र शासनाच्या ‘सीआरएस’पोर्टलवर जन्म-मृत्यू नोंदणीत प्रथम येण्याचा विक्रम खामगाव नगर पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने कधीचाच आपल्या नावावर केला आहे. त्यानंतर आता खामगाव पालिकेतील जन्म-मृत्यू नोंदणी विभागाने नागरिकांना विविध सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या कार्यालयात जन्म-मृत्यू नोंदणी आणि इतर सुविधांसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत नाही. त्याचवेळी १ जानेवारी २०२० पासून अभिप्राय पुस्तिकेच्या माध्यमातून या कार्यालयाने आपल्या कामकाजात आमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. जन्म-मृत्यू नोंदणी आणि प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येणाऱ्यांचा या पुस्तिकेत अभिप्राय घेतल्या जात आहे.खामगाव नगर पालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील अभिप्राय पुस्तिका नगर पालिकेची जनमाणसात प्रतिमा सुधारण्यास उपयुक्त ठरत असल्याची चर्चा आहे.
समाधानकारक अभिप्रायांची नोंद गत महिनाभरात झाल्या आहेत. जन्म-मृत्यू नोंदणी तसेच या कार्यालयातून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लागणाºया अर्जाचा नमुना(भरलेला फॉरमॅट) या कार्यालयात उपलब्ध आहे. त्यामुळे सामान्यांना येथे अर्ज भरताना त्रास होत नाही. अर्ज भरण्यासाठी आवश्यक त्या सुविधाही येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे गत महिनाभरात अनेकांनी आपल्या लिखित सकारात्मक अभिप्रायाची नोंद करीत विभाग प्रमुख राजेश मुळीक, लिपिक कमलाकर चिकणे, चतुर्थश्रेणी कर्मचारी चेतन सारसर यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे.