सुलतानपूर, दि. १८- बुलडाणा जिल्हा परिषदेंतर्गत लोणार तालुक्यातील ५७ - सुलतानपूर या निवडणूक विभागात १६ फेब्रुवारी २0१७ रोजी मतदान घेण्यात आले. मात्र, येथील ५७/६ या मतदान केंद्रावर बॅलेट युनिटबाबत तक्रारी आल्या होत्या. या मतदान केंद्रावरील तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला कळविले असता आयोगाने सुलतानपूर येथील ५७/६ मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे कळविले आहे.या मतदान केंद्रावर २१ फेब्रुवारी २0१७ रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेपयर्ंत फेरमतदान घेण्यात येणार आहे. तरी या मतदान केंद्राशी संबंधित मतदारांनी नोंद घ्यावी आणि फेरमतदान करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर शाही लावण्याच्या सूचनादेखील वरील आदेशामध्ये देण्यात आल्या आहेत. वरील विषयी जि.प.च्या अपक्ष उमेदवार आशाताई अरुण झोरे यांनी आक्षेप नोंदवून फेरमतदानाची मागणी केली होती. अपक्षाची नारळ निशाणीचे बटण दाबल्यास मीना मदन पिसे यांच्या कमळ निशाणीवर सदर मतदान होत असल्याचे संकेत मतदान यंत्र देत असल्याचे त्यांनी मतदान केंद्राध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी सदर बाब मान्य केली.
सुलतानपूर येथील मतदान केंद्रावर फेरमतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2017 2:12 AM