निसर्गाच्या लहरीपणामुळे सातत्याने नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना गतवर्षी लॉकडाऊननंतर अतिवृष्टीचा फटका बसला. परिणामी उत्पन्नात घट आली, अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यात यंदा लॉकडाऊनचा सामना करावा लागत असल्याने शेतीशी निगडित जोडव्यवसाय देखील बुडाला आहे. कुक्कुट पालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना बर्ड फ्लूमुळे नुकसान सोसावे लागले. दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत आहेत. भाजीपाला व फळ विक्रीला वाव नसल्याने यातूनही शेतकऱ्यांना हाती काहीच आले नाही. अशा बिकट अवस्थेतून जात असतानाही शेतकरी उमेदीने खरीपाच्या तयारीला लागला आहे. बी-बियाणे व खतांच्या खरेदीसाठी कर्जावर अवलंबून असलेला शेतकरी पीककर्जासाठी बँकाच्या दारात उभा आहे. रासायनिक खतांच्या किमतीत कुठल्याही प्रकारे वाढ होणार नसल्याचे जाहीर करूनही खतांच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे बसणारा आर्थिक भूर्दंड सहन करणे शक्य नसल्याने खतांची भाववाढ तातडीने मागे घेऊन जुन्या दरातच खते देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
खतांच्या दरवाढीचा 'फॉर्म्युला'
दरवर्षी खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांमध्ये भरमसाट दरवाढ केली जाते. यावर ओरड झाल्यानंतर त्यामध्ये काही प्रमाणात दर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा कांगावा सरकारकडून केला जातो. शेतकऱ्यांना नागविण्याचा हाच 'फॉर्म्युला' यंदाही वापरण्यात येत आहे. वस्तुत: कोरोनामुळे उद्भवलेल्या या स्थितीत किंचितही दरवाढ परवडणारी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी हा डाव हाणून पाडवा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
असे आहेत दर !
खतांचे प्रकार २०२० चे दर २०२१ चे दर
१०:२६:२६ १२७५ १९२५
२४:२४:० १३५० १९००
२०:२०:०:१३ १०५० १६००
डीएपी १२०० १९००
सुपर फॉस्फेट (दाणेदार) ४०० ५००
सुपर फॉस्फेट (पावडर) ३७० ४७०