नुकतेच तालुक्यातील खेर्डी, रुईखेड टेकाळे, सव, येळगाव येथील शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाला बळीराजाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गतवर्षी कोरोनाकाळात अडचणीत सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने प्रदेश काँग्रेसच्या महिला सरचिटणीस तथा जि. प. सदस्य ॲड.जयश्री शेळके यांच्या संकल्पनेतून 'दिशा हेल्पलाईन' सुरु करण्यात आली. तेव्हापासून सातत्याने विविध प्रकारे ' दिशा ' चे मदतकार्य सुरु आहे. अनेक नागरिकांना या माध्यमातून मदत करण्यात आली. दरम्यान, पेरणी काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घरपोच खते उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने वाहतुकीच्या साधनांच्या अडचणी आहेत. शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी जाता येत नाही. दुकानांच्या विशिष्ट वेळा ठरवून दिलेल्या असल्याने त्या वेळेतच खरेदीसाठी जावे लागते. या गोष्टींचा विचार करुन दिशा हेल्पलाईनकडून घरपोच खत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे आगाऊ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कमी दरात खत मिळत असून त्यांचा वाहतुकीचा खर्चही वाचत आहे. मागील वर्षापासून कोरोनामुळे सर्वांनाच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच तीन- चार दिवसांपूर्वी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घातली आहे.
५०० बॅगचा केला पुरवठा
कोरोनाकाळात दिशा हेल्पलाईनच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या घरपोच खत उपक्रमाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ५०० बॅग खताचा थेट बांधावर, गावात पुरवठा करण्यात आला. शेतकऱ्यांनी मागणी नोंदविल्यानुसार त्यांना खत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.