बुलडाणा : शासनाने ‘लॉकडाउन’ १७ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या आदेशाला शहरी भागातील नागरिकांकडून हरताळ फासल्या जात आहे. पोलिस बंदोबस्ताचा असलेला अभाव या सर्व परिस्थितीला कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवरील प्रचंड गर्दी पाहून ‘लॉकडाउन’ उठविण्यात आल्याचा भास ४ मे रोजी अनेक ठिकाणी अनुभवायला मिळाला. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आधी ३ मे पर्यंत असलेले ‘लॉकडाउन’ आणखी १७ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. खबरदारी म्हणून आतापर्यंत पार पडलेले ‘लॉकडाउन’चे दोन टप्पे यशस्वीरीत्या पार पडले आहेत. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. परिणामी २४ पर्यंत गेलेला पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आता केवळ ४ वर आला आहे.
गेल्या आठवडाभरापासून एकही नवा रुग्ण आढळून आला नसून आतापर्यंत २० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तरीदेखील धोका टळलेला नसून ‘कोरोना’ ला हरविण्यासाठी नागरिकांनी आणखी काही दिवस संयम पाळून घरताच थांबण्याची गरज आहे. दरम्यान, ४ मे रोजी ‘लॉकडाउन’च्या तिसºया टप्प्याला सुरूवात झाली. मात्र अगदी सकाळपासूनच जिल्ह्यातील शहरी भागात रस्त्यांवर चिक्कार गर्दी दिसून आली. यामुळे ‘लॉकडउन’चा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. आपल्यासोबतच इतरांचा जीव धोक्यात टाकण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाल्याचे आढळून आले नाही. हा प्रकार थांबविण्यासाठी नियमाचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.
अनेक नाके पोलिस बंदोबस्ताविना
बुलडाणा शहरात असलेल्या काही नाक्यांवरील आढावा घेतला असता त्याठिकाणी एकही पोलिस कर्मचारी हजर नसल्याचे पाहायला मिळाले. यामुळे नागरिक कसलीही भीती न बाळगता मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. हा प्रकार पूर्णपणे चुकीचा असून पोलिस प्रशासनाने ही सर्व परिस्थिती गांभीर्याने घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.