लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : राज्यभर सर्वत्र पाऊस पडत असताना जळगाव जामोद तालुक्यावर मात्र वरुणराजा रुसला आहे. निम्म्यापेक्षा जास्त तालुका अद्यापही कोरडाच असून, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. लहरी पावसाच्या फटक्यात यावेळी हा तालुका सापडला आहे. काही भागात भरपूर पाऊस पडतो तर काही भाग नेहमीच सुटतो. यामुळे बऱ्याच भागात अद्याप पेरण्या बाकी आहेत, तर ज्या पेरण्या झाल्या, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आहे.जळगाव, खेर्डा, वडशिंगी, सावरगाव, चावरा, मडाखेड, इलोरा, काजेगाव, भेंडवळ, कुरणगाड, निंभोरा इत्यादी गावांमध्ये अत्यल्प पाऊस झाला. त्यातच इतर ठिकाणी पेरण्या सुरू झाल्या म्हणून आज ना उद्या पाऊस पडेल, या आशेवर या परिसरातील शेतकऱ्यांनीही पेरण्या आटोपल्या; परंतु पुरेसा दमदार पाऊस या भागातच झालाच नाही तेव्हा कुठेतरी उगवलेले कोंब वगळता दुबार पेरणीचे चित्र शेतकऱ्यांना दिसत आहे, तर अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनही बाकीच आहेत.पिंपळगाव मंडळात सर्वाधिक पाऊसतालुक्यात पाच मंडळ असून, त्यात पिंपळगाव काळे, आसलगाव, जळगाव जामोद, वडशिंगी या सर्वच ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. याद्वारे तालुक्यामध्ये झालेल्या पावसाची सरासरी कळते. त्यानुसार आतापर्यंत पिंपळगाव २५६ मि.मी., आसलगाव १५३ मि.मी., जळगाव २०९ मि.मी., जामोद ११३ मि.मी. आणि वडशिंगी महसूल मंडळात सर्वात कमी फक्त ४५ मि.मी. मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा पिंपळगाव काळे मंडळात कोसळला आहे. तेव्हा प्रशासनाने दुबार पेरणी व उलटलेल्या पेरण्यांचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी शेतकरीवर्गामधून केली आहे.
लहरी पावसाचा फटका
By admin | Published: July 07, 2017 12:26 AM