लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: वाढत्या कोरोना विषाणू संक्रमणामुळे सद्यस्थितीत आरोग्य यंत्रणेवर कमालिचा आर्थिक बोजा पडत आहे. आरोग्य यंत्रणेवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी मदत म्हणून खामगाव कृउबासने उत्पन्नाच्या २५ टक्के रक्कम म्हणजेच १५ लाख रुपये खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयाकडे सुपूर्द केले आहेत. कृउबासने कोविड उपाययोजनेसाठी निधी देण्याची मागणी मनसेचे विठ्ठल लोखंडकार यांनी पणन संचालकांकडे केली होती. कोरोना विषाणू संक्रमणामुळे गत दीड वर्षांपासून सर्वच स्तरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सामान्यांची चांगलीच ससेहोलपट होत असून कोविड रूग्णालयात, कोविड केअर सेंटरमध्ये खाटा अपुºया पडत असल्याने अनेकांना उपचाराअभावी जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्पन्नापैकी २५ टक्के रक्कम खर्च करून तात्काळ सर्व सुविधा असलेले कोविड सेंटर खोलण्याची मागणी सहकार सरचिटणीस शॅडो कॅबिनेट मंत्री मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांनी केली होती. तसेच यासंदर्भात संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुद्धा केला. पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांच्याशीही दोन वेळा चर्चा करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री राजेंद्र शिंगणे ,पणन संचालक सतीश सोनी , जिल्हाधिकारी राममूर्ती ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत पाटील , जिल्हा उपनिबंधक राठोड, निवासी वैद्यकीय अधीक्षक निलेश टापरे ,कृ. उ. बा. समिती प्रशासक महेश कृपलानी,सचीव मुगुटराव भिसे यांनी सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय साहित्य विकत घेण्याकरिता त्वरित प्रस्ताव तयार केला. त्यानंतर निधी उपजिल्हा सामान्य रूग्णालयाकडे सुपूर्द करण्याचा मार्ग मोकळा झाला.
तज्ज्ञ डॉक्टर आणि मनुष्यबळाअभावी सामान्य रूग्णालयाला मदत-अनुभवी डॉक्टर आणि स्टॉप उपलब्ध होत नसल्यामुळे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयाला १० आयसीयू बेड, बायोमेडीमॅक्स मल्टीपॅरा मॉनिटर-०६ आणि बेड साइड लॉकर खरेदी करण्यासाठी १५ लक्ष ३५ हजारांची मदत केली आहे. पणन संचालक सतीश सोनी यांनी लोखंडकार यांच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर उपजिल्हा सामान्य रूग्णालयात आणखी १० अतिरिक्त बेड वाढविण्यास मदत झाली आहे.
- राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कोरोना काळात स्वत:चे कोविड रूग्णालय सुरू करण्याची आपली मागणी होती. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर आणि मनुष्यबळा अभावी खामगाव कृउबासने खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयाला १५ लाखांची मदत केली आहे.- विठ्ठल लोखंडकारमनसे नेते, बुलडाणा.